गुंडगिरीच्या निषेधार्थ पाथर्डीत व्यापा-यांचा मोर्चा, बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2020 07:26 PM2020-02-03T19:26:06+5:302020-02-03T19:27:14+5:30
पाथर्डी : शहरात व्यापा-यांना खंडणीसाठी धमकावण्याच्या घटनांमध्ये कमालीची वाढ झाली आहे. याबाबत तक्रारी देऊनही पोलीस प्रशासनाकडून ठोस कारवाई होत ...
पाथर्डी : शहरात व्यापा-यांना खंडणीसाठी धमकावण्याच्या घटनांमध्ये कमालीची वाढ झाली आहे. याबाबत तक्रारी देऊनही पोलीस प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसल्याच्या निषेधार्थ व्यापा-यांनी सोमवारी सकाळी १० वाजता कडकडीत बंद पाळून पोलीस ठाण्यावर व तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी तहसीलदार नामदेव पाटील यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
व्यापारी सुरेश चोरडिया यांना खंडणी उकळण्यासाठी खोट्या गुन्ह्यात अडकविण्याचा प्रयत्न होत आहे. याबाबतच्या तक्रारी पोलिसांकडे करण्यात आल्या. मात्र पोलिसांनी काहीही कारवाई केलेली नाही. असाच प्रकार इतरही व्यापा-यांबाबत घडतो. त्यामुळे याबाबतचे निवेदन तहसीलदार, पोलीस निरीक्षक यांच्यासह आमदार, खासदार यांनाही देण्यात आले. मात्र कोणतीही ठोस कारवाई झाली नाही, असे निवेदनात म्हटले आहे.
व्यापा-यांनी तहसीलदार नामदेव पाटील यांना निवेदन दिले. यावेळी सुभाष चोरडिया, शरद रोडी, अभिजित गुजर, सतीश गुगळे, राजेंद्र गांधी, रतिलाल पटवा, चंपालाल गांधी आदींसह बहुसंख्येने व्यापारी उपस्थित होते.