पतंग उत्सवात पारंपरिक धाग्याचा वापर करावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 04:20 AM2020-12-31T04:20:43+5:302020-12-31T04:20:43+5:30
कोपरगाव : कोपरगाव शहरात सद्यस्थितीत पतंग उडविण्यासाठी मोठ्या प्रमाणात चिनी मांजा वापरला जात आहे. त्यामुळे शहरातील पतंगप्रेमींनी जीवघेणा मांजा ...
कोपरगाव : कोपरगाव शहरात सद्यस्थितीत पतंग उडविण्यासाठी मोठ्या प्रमाणात चिनी मांजा वापरला जात आहे. त्यामुळे शहरातील पतंगप्रेमींनी जीवघेणा मांजा न वापरता साधा पारंपरिक धागा वापरून उत्सवाचे महत्व टिकवावे, असे आवाहन कोपरगाव येथील मित्र फौंडेशनचे अध्यक्ष वैभव आढाव यांनी केले आहे.
सध्या पतंगबाजी करताना आपल्याच पतंगाचे साम्राज्य दीर्घकाळ आकाशात रहावे, या भावनेतून नायलॉन, तंगुस, चायना धागा वापरण्याचे प्रमाण वाढले आहे. पतंगबाजीत झाडांवर अडकेलेल्या नायलॉन धाग्यामुळे आकाशात मुक्त संचार करणारे पक्षी कायमचे जायबंदी झाले आहेत. पतंगबाजीतील तुटलेला पतंग अनेक ठिकाणी विजेच्या तारांवर अडकतो. पतंगाला जोडलेल्या नायलॉन धाग्यामुळे तो पतंग तेथेच अडकून पडतो. अशा प्रसंगी लहान मुले नायलॉन धाग्याला दगड बांधून विजेच्या खांबावरील पतंग काढण्याचा प्रयत्न करतात. यामुळे विजेच्या तारांचे घर्षण होवून अनेकवेळा वीजपुरवठा खंडित होऊन अपघाताचे प्रकार घडले आहेत. पतंग पकडण्याच्या नादात दरवर्षी रस्त्यावर मुलांचे अनेक अपघातही झाले आहेत. या जीवघेण्या मांजामुळे काही वर्षांपूर्वी एका शिक्षकाचा गळा कापल्याने जीवही गेला होता. मागील वर्षी एका साखर कारखान्याच्या कर्मचाऱ्याचादेखील गळा कापला होता. सुदैवाने त्यांचे प्राण वाचले होते. त्यामुळे नगरपरिषद व पोलीस प्रशासन यांनीदेखील अशा पद्धतीचा मांजा विकणाऱ्यांवर कारवाई करावी, असेही आढाव यांनी म्हटले आहे.