राशीनची येमाई देवी व महादेवांचा रंगला पारंपरिक विवाह सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2018 01:31 PM2018-03-26T13:31:08+5:302018-03-26T13:31:34+5:30
राज्यातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान राशीनची जगदंबा (येमाई) देवी मंदिरात रविवारी रात्री तेलवण अष्टमीचा कार्यक्रम पारंपरिक पध्दतीने उत्साहात पार पडला.
राशीन : राज्यातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान राशीनची जगदंबा (येमाई) देवी मंदिरात रविवारी रात्री तेलवण अष्टमीचा कार्यक्रम पारंपरिक पध्दतीने उत्साहात पार पडला. या सोहळ्यात येमाई देवी व महादेवाचा विवाह सोहळा चैत्र व मार्गशिर्ष या महिन्यातील दुर्गाष्टमीला हा विवाह सोहळा पारंपरिक पध्दतीने यंदाही सालाबादप्रमाणे रंगला.
देवीला व महादेवांना गरम पाण्याने स्नान घातले जाते. हळकुंडाचे काकण बांधून देवीला व महादेवाला फुलांच्या मंडोळ्या घातल्या जातात. देवीची महावस्त्रलंकार पूजा बांधली जाते. दरम्यान संध्याकाळी गावातील महिला मंदिरात एकत्र येतात. देवीच्या धुपारतीच्यावेळेस मंध्यतरी देवीला तेलवणाचे गाणे म्हणत देवीला तेलवण लावले जाते. या तेलवण कार्यक्रमात देवी व महादेवाचा विवाह करण्याची पारंपरिक पध्दत आहे. हा कार्यक्रम पार पडल्यानतंर पानाचे विडे महिलांना दिले जातात. देवीला तेलवण लावण्याची प्रमुख सेवा परिट समाजातील महिलेला आहे. हा दिमाखदार सोहळा पाहण्यासारखा असतो. यंदाही हा सोहळा पार पडल्यानंतर फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.
असे असते पारंपरिक तेलवण.....
देवीच्यापुढे चोळीच्या खणावर धान्याची रास घातली जाते. या रासीवर मध्यभागी तेलाचे भांडे ठेवतात असलेल्या वेताच्या काठीच्या टोकाला सुताच्या धाग्याच्या साह्याने नागिणीचे पान बांधले जाते. त्या काठीच्या पानाचे टोक तेलाच्या भांड्यात बुडवून देवीच्या महिरप (कमान) तेल लावले जाते. यावेळी तेलवणाचे गाणे म्हणत हि प्रकिया केली जाते. देवीला तेलवण लावल्यानंतर अशीच प्रक्रिया महादेवाच्या मंदिरात पार पडते. या सोहळ्यात यंदाही येमाई देवीचा व महादेवांचा विवाह सोहळा उत्साहात पार पडला.