नगर-पुुणे रस्त्यावरील वाहनांची वर्दळ घटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 04:21 AM2021-03-27T04:21:16+5:302021-03-27T04:21:16+5:30
सुपा : नगर-पुणे रस्त्यावरील वाहनांची वर्दळ घटल्याने सुपा (ता.पारनेर) येथील व्यावसायिक अडचणीत सापडले आहेत. येथील बाजारात ग्राहक, ...
सुपा : नगर-पुणे रस्त्यावरील वाहनांची वर्दळ घटल्याने सुपा (ता.पारनेर) येथील व्यावसायिक अडचणीत सापडले आहेत. येथील बाजारात ग्राहक, विक्रेत्यांनी मास्कपासून फारकत घेतली आहे. कोरोनाबाबतच्या नियमांना ग्रामस्थ हरताळ फासताना दिसतात.
सुप्यात दररोज बाजार भरतो. तेथे भाजीपाला फळे व जीवनावश्यक वस्तू यांची खरेदी विक्री होत असते. तरीही बुधवारी आठवडे बाजारच्या दिवशी जवळपासच्या १० ते १५ गावातून शेतकरी, विक्रेते, ग्राहक यांची गर्दी दिसते. त्यामुळे फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडतो. अनेक जण विनामास्क फिरताना दिसतात. सुपा पोलीस सायंकाळी बाजारतळावर विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करतात. बसस्थानक चौक, हार विक्रेते, बेकरी पॉइंट, गावातील व नवीन वसाहतीतील चौक, गर्दीच्या ठिकाणी जाऊन अशी मोहीम राबविण्याची मागणी होत आहे.
वाढत्या कोरोना रूग्णांमुळे नगर-पुणे रस्त्यावरील वाहतूक मंदावली आहे. त्यामुळे सुप्यातील व्यावसायिक अडचणीत आले आहेत. येथे फुलांच्या हारांची दुकाने असून त्याद्वारे अनेक तरुणांना स्थानिक पातळीवर रोजगार मिळतो. हार तयार करणारे कामगार, विक्रेते यांची कुटुंब त्यावर अवलंबून आहेत. तसेच अनेक बेकरीही आहेत. त्यातूनही अनेकांना रोजगार मिळतो. मात्र रस्त्यावरील वर्दळ कमी झाल्याने सर्वच व्यावसायिक अडचणीत आले आहेत. कोरोनाच्या भीतीने हॉटेलमधील ग्राहकही बंद झाले. त्यामुळे दोन ते तीन महिन्यांपूर्वी सुरू झालेले हॉटेल बंद होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे हे व्यावसायिक संकटात आहेत.
--
एमआयडीसीतील कारखाना व्यवस्थापनाने नव्याने बाहेरून येणाऱ्या कामगारांची स्थानिक आरोग्य विभागाला माहिती देणे. कोरोना तपासणी करून घेणे. क्वारंटाईन करणे. पुन्हा तपासणी व मग कामावर रूजू करणे गरजेचे आहे, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
----
२६ सुपा
सुपा येथील आठवडे बाजारातील ग्राहक-विक्रेत्यांमधील हरविलेले सामाजिक अंतर.