संगमनेरात अवैध वाळू वाहतूक प्रकरणी दोघांवर कारवाई : ट्रॅक्टर चालक फरार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2019 06:50 PM2019-04-24T18:50:13+5:302019-04-24T18:50:29+5:30
वाळूची अवैधरित्या वाहतूक करणारे विनाक्रमांकाचे दोन ट्रॅक्टर ट्रॉलीसह पोलिसांनी पकडले.
संगमनेर : वाळूची अवैधरित्या वाहतूक करणारे विनाक्रमांकाचे दोन ट्रॅक्टर ट्रॉलीसह पोलिसांनी पकडले. ही कारवाई बुधवारी पहाटे तालुक्यातील कासारा-दुमाला गावच्या शिवारात करण्यात आली. यात दोन ट्रॅक्टर ट्रॉलीसह व वाळू असा सुमारे ५ लाख ९० हजार ३०० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात दोन्ही ट्रॅक्टरवरील अज्ञात चालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून ते पसार आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, प्रवरा नदीपात्रातून वाळू तस्करी सुरू असल्याची माहिती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभय परमार यांना मिळाली. पोलीस निरीक्षक परमार हे पथकासह गस्तीवर असताना बुधवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास कासारा-दुमाला गावच्या शिवारात दोन ट्रॅक्टर ट्रॉलीसह त्यांना दिसले. पोलिसांनी सदर ट्रॅक्टर रोखत त्यांच्या चालकांकडे विचारणा करीत असताना हे दोन्ही चालक ट्रॅक्टर सोडून पळून गेले. या ट्रॅक्टरमधून अवैधरित्या वाळू वाहिली जात असल्याची खात्री झाल्यानंतर दोन्ही ट्रॅक्टर, ट्रॉली व त्यातील वाळू पोलिसांनी ताब्यात घेऊन शहर पोलीस ठाण्यात आणले. पळून गेलेल्या या दोन्ही ट्रॅक्टरवरील अज्ञात चालकांविरोधात पोलीस कॉँस्टेबल महादेव हांडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक परमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉँस्टेबल अमित महाजन, राजेंद्र गायकवाड, पोलीस कॉँस्टेबल हांडे, विजय पवार आदींनी केली.