रेल्वे रद्द झाल्याने प्रवाशांना मानसिक त्रास
By सुदाम देशमुख | Published: September 3, 2022 12:22 PM2022-09-03T12:22:32+5:302022-09-03T12:26:27+5:30
साईनगर (शिर्डी) ते हावडा, पुणे ते हावडा, मुंबई ते हावडा या एक्सप्रेस गाड्या रेल्वेने अचानक रद्द केल्याने महिन्याभरापूर्वी तिकीट आरक्षित केलेल्या प्रवाशांना मानसिक त्रासा बरोबर आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो आहे.
पुणतांबा: (जि. अहमदनगर ):
साईनगर (शिर्डी) ते हावडा, पुणे ते हावडा, मुंबई ते हावडा या एक्सप्रेस गाड्या रेल्वेने अचानक रद्द केल्याने महिन्याभरापूर्वी तिकीट आरक्षित केलेल्या प्रवाशांना मानसिक त्रासा बरोबर आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो आहे.
तीन सप्टेंबर रोजी हावडा जाणाऱ्या सर्व रेल्वे रद्द झाल्याने आगाऊ नियोजन करून तिकीट आरक्षित केलेल्या प्रवाशांना परतीचे तसेच मधील तारखांचे आरक्षित केलेले सर्व तिकीट जीएसटीसह भुर्दंड सहन करून रद्द करावी लागली असून रेल्वेच्या या निर्णयाने प्रवासी संताप व्यक्त करत आहे तर स्थानिक पातळीवरील रेल्वे अधिकारी कोणतीच माहिती देऊ शकत नाही आणि अधिकृत माहितीसाठी मोठे शहर आणि विभागीय कार्यालयात जनसंपर्क अधिकारी असतात, पण तेही योग्य माहिती देऊ शकत नसल्याने फक्त ग्राहकांना भुर्दंड देणारा रद्द केलेल्या तिकिटांचा संदेश प्राप्त होत आहे.
या झालेल्या नुकसानीचे भरपाई कोण देणार असाही प्रश्न उपस्थित होत असून काही मुलांच्या मेडिकलच्या परीक्षा चार तारखे दरम्यान असल्याने ते विद्यार्थी सुध्दा परीक्षेला मुकले असल्याने त्यांचे शैक्षणिक नुकसानीची कोण जबाबदारी स्वीकारणार असा संतप्त सवाल पालक वर्गात व्यक्त होत आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर अधिकृत जनसंपर्क अधिकारी नेमून रद्द झालेल्या किंवा होणाऱ्या गाड्यांची माहिती आगाऊ मिळावी यासाठी अधिकाऱ्यांना हार तुरे वाहणाऱ्या प्रवासी संघटनेने आंदोलन उभारण्याची मागणी सामान्य प्रवासी करत आहे.
नामदेवराव धनवटे(स्थानिक प्रवासी): मी व माझ्या परिवारातील चौदा सदस्याचे तिकीट साईनगर ते हावडा आरक्षित केले होते. व त्याच अनुषगाने हावडा ते पुरी आणि पुन्हा पुरी ते साईनगर असे आरक्षित केलेले तिकिटे रद्द करावे लागले त्याचा आर्थिक फटका बसला तो वेगळा पण मानसिक त्रास वेगळाच. डी.बी. त्रिभुवन(पालक): माझ्या मुलीची हावडा येथे मेडिकलची परीक्षा चार तारखेला होती पण रेल्वे रद्द झाल्याने परीक्षेला जाता आले नाही.
रद्द झालेल्या गाड्या
1) jnaneshwari Exp (12101) लोकमान्य टिळक टर्मिनस ते शालिमार
2) Howrah mail (12809) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते हावडा
3) LTT Shalimar EX(18029) लोकमान्य टिळक टर्मिनस ते शालिमार 4)SNSI Howrah Exp (22893) साई नगर शिर्डी ते हावडा