अकोल्यात निवडणुकांची तालीम

By Admin | Published: June 26, 2016 12:27 AM2016-06-26T00:27:27+5:302016-06-26T00:36:28+5:30

अकोले : आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अकोल्यात सर्वच पक्षांनी विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून तयारी सुरू केल्याचे समोर येत आहे

Training in elections in Akola | अकोल्यात निवडणुकांची तालीम

अकोल्यात निवडणुकांची तालीम


अकोले : आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अकोल्यात सर्वच पक्षांनी विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून तयारी सुरू केल्याचे समोर येत आहे. कार्यक्रम सामाजिक असले तरी त्याला राजकीय फोडणी ओघाने मिळतेच, हे गेल्या काही दिवसांत स्पष्ट झाले.
भाजपचे कार्यकर्ता शिबिर, राष्ट्रवादीचे पुस्तक प्रकाशन, ठाकर समाजाचा मेळावा, तर शेतकरी संघटना, मार्क्सवादी किसान सभेची पाणी परिषद अशा कार्यक्रमांतून शक्तीप्रदर्शन करत निवडणुकांची तयारी सुरू झाली आहे.
२ जूनला भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष आमदार चौनसुख संचेती यांनी आदिवासी भागाचा दौरा करुन वातावरण ढवळून काढले. आदिवासींशी हितगूज साधत भविष्यात पाणी टंचाईचा समूळ नायनाट कसा करता येईल? त्या अनुषंगाने प्रयत्न करु, तसेच जेथे चुकीचे काम चालले असेल त्याचा बंदोबस्त करु, असा विश्वास कार्यकर्त्यांना दिला. अशोक भांगरे, जि. प. सदस्या सुनीता भांगरे, जि. प. सदस्य डॉ. किरण लहामटे, पं. स. सदस्य दिलीप भांगरे यांनी यावेळी मतदारसंघातील समस्या त्यांच्यासमोर मांडल्या.
४ जूनला माजी मंत्री मधुकर पिचड व आमदार वैभव पिचड यांच्या नेतृत्वाखाली कांदा व दूध रस्त्यावर ओतून तालुका राष्ट्रवादी काँग्रेसने शेती मालाला व दुधाला भाव मिळावा, शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी अशा २७ मागण्यांसाठी एल्गार पुकारत रास्ता रोको आंदोलन छेडले.
१४ जूनला अकोले शहर व ३२ गाव नळ पाणी पुरवठा योजनेला निधी मिळावा यासाठी आमदार वैभव पिचड यांनी कार्यकर्त्यांसमवेत तहसील कचेरीसमोर लाक्षणिक उपोषण केले. तर याच दिवशी भाजपाने अगस्ती आश्रमात कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर घेतले. त्यात सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू माणून त्यांच्यापर्यंत सरकारच्या जनकल्याणकारी योजना पोहोचविण्याचे काम कार्यकर्त्यांनी करावे, असे आवाहन भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड यांनी केले.
१५ जूनला मार्क्सवादी किसान सभा व शेतकरी संघटनेने निळवंडे पाणी हक्क संघर्ष समितीच्या माध्यमातून पाणी परिषद घेतली. निळवंडेचे कालवे वितरकांसह जमिनी खालून करा, हक्काचे पाणी द्या अशा अकोलेकरांच्या भावनिक मुद्द्यांना त्यांनी हात घातला. जल अभ्यासक प्रदीप पुरंदरे, किसान सभेचे केंद्रीय सहसचिव कॉम्रेड डॉ. अशोक ढवळे, शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष शरद देशमुख, मार्क्सवादी किसान सभेचे प्रदेश सचिव कॉम्रेड डॉ .अजित नवले आदी यावेळी उपस्थित होते.
१९ जूनला माजी उपमुख्यमंत्री आमदार अजित पवार यांच्या उपस्थितीत तालुक्यातील इंदोरी येथे ‘कथा निळवंडे धरणाची’ या पुस्तकाचे प्रकाशन झाले. माजी मंत्री मधुकर पिचड, आ. वैभव पिचड, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सीताराम गायकर आदींच्या उपस्थितीत पवार यांनी आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची चांगली तयारी करा, असा सल्ला दिला.
(तालुका प्रतिनिधी)

Web Title: Training in elections in Akola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.