कोपरगाव कारागृहातील ७७ आरोपींची हर्सुल व नाशिकरोड जेलमध्ये रवानगी
By सचिन धर्मापुरीकर | Published: August 20, 2023 07:43 PM2023-08-20T19:43:36+5:302023-08-20T19:43:47+5:30
इमारत बांधण्यासाठी कारागृह केले रिकामे
कोपरगाव (जि. अहमदनगर) : कोपरगाव कारागृहातील कैद्यांची अतिरिक्त झालेली संख्या पाहता कारागृह प्रशासनाने घेतलेल्या निर्णयानुसार ७७ कैदींना संभाजीनगर येथील हर्सुल व नाशिक रोड कारागृहात हलविण्यात आले. शनिवारी व रविवारी अशी दोन टप्प्यात आरोपींची रवानगी करण्यात आली.
कोपरगाव येथील कारागृहाची वास्तू ही ७० वर्षापूर्वीची आहे. या कारागृहातील सर्व बराकींकींची अवस्था ही अत्यंत खराब झालेली आहे. त्याची दुरुस्ती ही मुदतीत होणे गरजेचे आहे. तात्पुर्त्या स्वरुपात कारागृहाची दुरुस्ती करून मिळण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता यांना दि. २० जानेवारी रोजी कळविण्यात आले होते. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम उपविभागाने पत्र देऊन दुरुस्तीच्या कामास मंजूरी प्राप्त करुन जेलची इमारत दुरुस्तीसाठी तीन महिन्याचा कालावधी लागणार असून त्यासाठी जेलची इमारत रिकामी करुन ताब्यात मिळण्याची मागणी केली. त्यानुसार जेलचे अधिक्षक तथा तहसिलदार संदिपकुमार भोसले यांनी दि. १५ जुलै २०२३ रोजी कारागृह उपमहानिरीक्षक, पश्चिम विभाग येरवडा पुणे यांना जेलमधील सर्व ७७ आरोपींना अन्यत्र वर्ग करण्याची परवानगी मिळावी असा लेखी प्रस्ताव पाठविला होता. पुणे विभागाचे डी. आय. जी. यांचेकडून दि. १४ ऑगस्ट रोजी मंजूरी आल्यानंतर तुरुंगाधिकारी चंद्रशेखर कुलथे यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी, शिर्डी यांना पोलीस बंदोबस्त मिळण्याची मागणी केली. होती.
कोपरगाव शहर पोलीस स्टेशनचे प्रदिप देशमुख यांनी तातडीने अहमदनगरच्या पोलीस मुख्यालयाकडून पोलीस व्हॅनची मागणी केली. उपविभागीय पोलिस अधिकारी संदिप मिटके यांनी ७७ आरोपींना घेऊन जाण्यासाठी दोन पोलीस अधिकारी व ८० पोलीस कर्मचारी उपलब्ध करुन दिले.
कोपरगाव दुय्यम कारागृहात सध्या दाखल असलेल्या गंभीर गुन्हयांतील खून, लव्ह जिहाद प्रकरण, दरोडा, रस्तालूट, शिर्डीतील ठेवीदारांची फसवणूक केलेले सर्व आरोपी, बलात्कार, मुलींना फूस लावून पळवून नेणे, इ. गुन्ह्यातील पाच पोलीस स्टेशनच्या गुन्हयांतील ३७ आरोपींची सेंट्रल जेल, हर्सल छ. संभाजीनगर येथे दि. १९ रोजी तर २० ऑगस्ट रोजी नाशिक रोड येथील सेंट्रल जेलमध्ये अशा एकूण ७७ आरोपींची रवानगी पोलीस बंदोबस्तात करण्यात आली असल्याची माहिती तुरुंगाधिकारी चंद्रशेखर कुलथे यांनी दिली.