रात्री १२ पर्यंत चालल्या शिक्षकांच्या बदल्या
By Admin | Published: May 16, 2016 12:01 AM2016-05-16T00:01:08+5:302016-05-16T00:07:28+5:30
अहमदनगर : शुक्रवारपासून जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया सुरू झाली आहे. दोन दिवसांत रखडत रखडत मुख्याध्यापक आणि उपाध्यापक संवर्गातील शिक्षकांच्या बदल्या पूर्ण झाल्या आहेत.
अहमदनगर : शुक्रवारपासून जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया सुरू झाली आहे. दोन दिवसांत रखडत रखडत मुख्याध्यापक आणि उपाध्यापक संवर्गातील शिक्षकांच्या बदल्या पूर्ण झाल्या आहेत. शनिवारी रात्री १२ वाजेपर्यंत बदल्यांची प्रक्रिया सुरू होती. आतापर्यंत ४११ शिक्षकांच्या पेसा, समानीकरण आणि विनंती बदल्या झाल्या आहेत.
अवघ्या आठ दिवसांपूर्वी जिल्हा परिषदेत बदलून आलेले मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र बिनवडे यांनी डोळ्यात तेल घालत, बदल्यांच्या नियमाची काटेकोर अंमलबजावणी करत कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची प्रक्रिया राबवत आहेत. सर्वांत मोठा विभाग असणाऱ्या प्राथमिक शिक्षण विभागाची बदली प्रक्रिया किचकट प्रक्रियेमुळे वेळखाऊपणाची झाली. यात काही तालुक्यांनी परिपूर्ण माहिती सादर न केल्याने काही प्रकारातील बदल्या स्थगित ठेवण्यात आल्या.
शनिवारी दिवसभर आणि रात्री १२ पर्यंत पेसामधून ५६ शिक्षकांना बाहेर काढण्यात आले. तर तेवढेच शिक्षक पुन्हा पेसात पाठवण्यात आले. ३४ शिक्षकांची समानीकरणात बदली करण्यात आली असून २६५ शिक्षकांनी आपसी बदलीचा फायदा घेतला. या बदल्यांची प्रक्रिया मोठी असल्याने त्यासाठी अधिक वेळ लागला.
शनिवारी रात्रीच कोणत्याही परिस्थितीत बदल्या पूर्ण करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. यामुळे बदली पात्र शिक्षकांना १२ वाजेपर्यंत जिल्हा परिषदेत थांबावे लागले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी बिनवडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक कोल्हे, शिक्षणाधिकारी अशोक कडूस, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षित यादव, उपशिक्षणाधिकारी गुलाब सय्यद, सामान्य प्रशासन विभागाचे अशोक व्यवहारे, ऋषिकेश बोरूडे प्रक्रिया राबवत होते.
रविवारी आरोग्य विभागाच्या स्थगिती दिलेल्या बदल्यांची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. यात आरोग्य सेवक पुरुष १४ पेसा, १३ समानीकरण, १ आपसी बदली, आरोग्य सेविका महिला १८ पेसा, १४ समानीकरण, १० आपसी बदल्या राबवण्यात आल्या. सुट्टी असताना जिल्हा परिषदेत गर्दी होती.
(प्रतिनिधी)