राहुरीच्या ग्रामीण रूग्णालयाला हवी ट्रॉमा सेंटरची जोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2019 12:17 PM2019-12-20T12:17:54+5:302019-12-20T12:18:28+5:30
राहुरी नगर परिषदेचा दवाखाना पुन्हा सुरू करून शासनाने ट्रॉमा सेंटर महात्मा फुले कृषी विद्यापीठात सुरू केले तर आरोग्याच्या प्रश्नाचा तिढा सुटण्यास मदत होईल़. त्या दृष्टिकोनातून आमदार प्राजक्त तनपुरे यांनी राज्य शासनाकडे पाठपुरावा करण्याची गरज निर्माण झाली आहे़.
भाऊसाहेब येवले ।
राहुरी : येथील ग्रामीण रू ग्णालयाचा निधी मंजूर असूनही इमारतीचा प्रश्न मार्गी न लागल्याने सर्वसामान्य रूग्णांना हक्काच्या उपचारापासून दूर रहावे लागत आहे़. राहुरी नगर परिषदेचा दवाखाना पुन्हा सुरू करून शासनाने ट्रॉमा सेंटर महात्मा फुले कृषी विद्यापीठात सुरू केले तर आरोग्याच्या प्रश्नाचा तिढा सुटण्यास मदत होईल़. त्या दृष्टिकोनातून आमदार प्राजक्त तनपुरे यांनी राज्य शासनाकडे पाठपुरावा करण्याची गरज निर्माण झाली आहे.
राहुरी नगर परिषदेच्या दवाखान्याचे रूपांतर ग्रामीण रूग्णालयात करण्यात आले आहे. ग्रामीण रूग्णालयाची इमारत पडल्याने ग्रामीण रूग्णालय राहुरी नगर परिषदेच्या इमारत जागेत स्थलांतरित करण्यात आले. मात्र अपुरी जागा, डॉक्टरांची अनुपस्थिती, वैद्यकीय सुविधांच्या अभावामुळे रूग्णांना उपचार न मिळाल्याने अहमदनगर येथे जाऊन उपचार करावे लागत आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या परिसरात ट्रॉमा सेंटर सुरू केले तर अवघड शस्त्रकिया करणे शक्य होईल़. महात्मा फुले कृषी विद्यापीठाने काही वर्षापूर्वी तुकाराम मोरे हे कुलगुरू असतांना डिग्रस परिसरात जागा देण्याचे मान्य केले होते. जागा वादग्रस्त व बाहेर असल्याने जागेचा प्रश्न सुटू शकला नाही.
राहुरी नगरपरिषदेचे रूग्णालय सुरू ठेऊन ट्रॉमा सेंटर विद्यापीठात सुरू करण्याची गरज आहे. सध्या उपलब्ध होणारी ३७ गुंठे जागा अपुरी पडत आहे.
श्रीरामपूर नगरपरिषदेचा दवाखाना शहरात व ग्रामीण रूग्णालय शिरसगावला आहे. नेवासा व संगमनेर येथेही याच पध्दतीने वैद्यकीय सुविधा उपलब्ध आहे.
राहुरी नगर परिषदेच्या माध्यमातून ओपीडी तर ट्रॉमा सेंटरच्या माध्यमातून अवघड शस्त्रक्रिया करणे शक्य होईल. त्यादृष्टिकोनातून राहुरीचे आमदार प्राजक्त तनपुरे यांनी शासनाकडे पाठपुरावा करणे गरजेचे आहे.
मंत्री जयंत पाटील यांच्या माध्यमातून पाठपुरावा केला तर राहुरीच्या वैद्यकीय क्षेत्राचा महत्वाचा समजला जाणारा प्रश्न मार्गी लागणे शक्य होईल.
राहुरी जिल्ह्यातील मध्यवर्ती ठिकाण असून नगर मनमाड राष्ट्रीय मार्गावर आहे. अनेकदा अपघात झाल्यानंतर पेशंटला अन्य शहरांमध्ये पाठवावे लागत आहे. ट्रॉमा सेंटरसाठी शासन दरबारी पाठपुरावा केला तर प्रश्न मार्गी लागू शकतो. त्यामाध्यमातून इमर्जंसी आॅपरेशन, हाड, मेंदू यावर उपचार करता येतील़ सिझरच्या प्रश्नासह पोस्टमार्टमसह कर्मचारी निवासाचा प्रश्न मार्गी लागेल. रूग्णांना चांगल्या सुविधा देता येणे शक्य होईल़ महात्मा फुले कृषी विद्यापीठात जागा उपलब्ध होऊ शकते़, असे राहुरी येथील ग्रामीण रुग्णालयाचे निवृत्त वैद्यकीय अधिकारी यांनी सांगितले.