एसटीच्या लाल डब्यातून प्रवास : पाच वर्षे अफवांचेच पीक आले; शेतक-यांची खदखद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2019 11:46 AM2019-04-09T11:46:37+5:302019-04-09T11:49:34+5:30

मागच्या पाच वर्षांत ना शेतमालाला भाव मिळाले, ना अनुदान मिळाले़ शेतकऱ्यांसाठी घोषणा लाख झाल्या़ पण पदरात काहीच पडले नाही़

Travel through bus : Farmers' Loans | एसटीच्या लाल डब्यातून प्रवास : पाच वर्षे अफवांचेच पीक आले; शेतक-यांची खदखद

एसटीच्या लाल डब्यातून प्रवास : पाच वर्षे अफवांचेच पीक आले; शेतक-यांची खदखद

ठळक मुद्देनगर-श्रीगोंदा 70 कि.मी.

साहेबराव नरसाळे
अहमदनगर : मागच्या पाच वर्षांत ना शेतमालाला भाव मिळाले, ना अनुदान मिळाले़ शेतकऱ्यांसाठी घोषणा लाख झाल्या़ पण पदरात काहीच पडले नाही़ अफवांचे पीक मात्र जोमदार उगवले, अशा शब्दात शेतकऱ्यांनी आपली खदखद ‘लोकमत’कडे व्यक्त केली़
अहमदनगर ते श्रीगोंदा (वाळकी मार्गे) बसमधील प्रवाशांची ‘मन की बात’ ‘लोकमत’ने जाणून घेतली़ बसमध्ये शाळकरी मुले, मुलींची गर्दी मोठी होती़ डाव्या बाजूने मधल्या सीटवर एक वयोवृद्ध आजोबा बसलेले होते़ त्यांच्याशी गप्पा सुरु झाल्या़ प्रथम त्यांना शंका आली की हे एखाद्या उमेदवारासाठी सर्व्हे तर करीत नाही ना? पत्रकार असल्याचे सांगितल्यानंतर त्यांच्या मनातील खदखद हळूहळू बाहेर येऊ लागली़ सरकारवरची नाराजी व्यक्त करीत मोदी हे काहीच काम करीत नाहीत़ मात्र, अफवा पसरविण्यात ते माहीर आहेत, असे या आजोबांनी सांगितले़ ‘मागील पाच वर्षांत आम्हाला कोणतेही अनुदान मिळाले नाही, शेतमालाला भाव मिळाला नाही, नुकसानभरपाई देखील मिळाली नाही़ कर्जमाफी तर लबाडाखरचं आवतन ठरली़ अनेक घोषणा झाल्या़ पण हातात काहीच आलं नाही’, असं त्यांचं म्हणणं़ बºयाचवेळ विचारुनही त्यांनी नाव सांगण्याचे टाळले़ नावासाठी आग्रह धरला तेव्हा म्हणाले, काही दिवसापूर्वी तीन तरुण भेटले होते़ तुझ्यासारखीच माहिती विचारत होते़ त्यांनी आमचं नाव, गाव, पत्ताही लिहून घेतला़ त्यानंतर काही दिवसात दुसरे लोकं आले आणि आमच्या उमेदवाराने अमूक केले, तमूक केले़ तो सर्वांना मोफत उपचार देतो़ तुमची काही अडचण असेल तर सांगा़ आम्ही दूर करु, असे सांगत मतांसाठी लकडाच पाठशी लावला़ नाव सांगितले अन् भलतेच लचांड अंगाशी आले़ त्यामुळे तुम्हाला काय छापायचे ते छापा पण नाव नाही सांगणार हवं तर अडनाव हराळ आहे़ तेव्हढंच घ्या़’
त्यांच्याशी बोलणं झाल्यानंतर मी मागच्या सीटवर बसलेल्या नाना पोपळघट यांच्याकडे गप्पा मारायला गेलो़ ते वडघुलला चालले होते़ ‘बाबा काय म्हणतेय लोकसभेची निवडणूक, असा प्रश्न त्यांना केला़ तर ते थोड्यावेळ निरखून पाहत राहिले अन् नंतर बोलले, ‘निवडणुकीचं काय आहे, येते आणि जाते़ आपल्याला काय फरक पडत नाही़ मत वाया जाऊ नये म्हणून करायंच कोणालाही़ ते एकदा निवडून आले की परत मतदार मेले की जिवंत आहेत, हेदेखील पहायला कोणी येत नाही़ कर्जमाफी झाली का, असे विचारल्यावर ते एकदमच उचकले़ कर्जमाफी जाऊ दे, आमच्या मालाला अगोदर भाव दे म्हणावं, सरकारला़ मागच्या वर्षी कसंबसं खाण्यापुरतं शेत पिकलं़ जे उरलं ते विकायला नेलं तर त्यालाही भाव नाही़ गाडीभाड्याचे पैसेही निघाले नाहीत़ आता उसनवारीचे पैसे फेडायला जातोय दुसरीकडे कामाला. तुम्हाला कोणता पक्ष आवडतो, असे विचारल्यावर पक्ष कोण पाहतो़ आपल्याकडं उमेदवार पाहून मत करायची सवय असते़ वरचा कोणीतरी नेता येतो आणि सांगतो आमूक एकाला मतदान करा़ आम्ही तेच करतो़

 

 

Web Title: Travel through bus : Farmers' Loans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.