एसटीच्या लाल डब्यातून प्रवास : मतांची भीक मागून आमचा काय विकास करणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2019 11:29 AM2019-04-09T11:29:44+5:302019-04-09T11:33:00+5:30
‘जे आमच्याकडे मतांची भीक मागतात, ते आमचा काय विकास करणार? एकदा निवडणूक झाली की पाच वर्षे आमच्याकडे कोणी फिरकतही नाही.
अनिल लगड
अहमदनगर : ‘जे आमच्याकडे मतांची भीक मागतात, ते आमचा काय विकास करणार? एकदा निवडणूक झाली की पाच वर्षे आमच्याकडे कोणी फिरकतही नाही. निवडणुकीत उमेदवारही लायकीचे नाहीत. जोपर्यंत उमेदवार लायकीचे देणार नाही तोपर्यंत मतदानच करणार नाही’ अशी प्रतिक्रिया अंबेजोगाईच्या एका प्रवाशाने देऊन आपल्या भावना व्यक्त केल्या.
‘लोकमत’ प्रतिनिधीने सोमवारी धानोरा-नगर या मार्गावर बीड-मुंबई एस.टी. बसमधील प्रवाशांच्या भावना जाणून घेतल्या. बीडच्या रामेश्वर शेळके या प्रवाशाने सांगितले की, गेल्या पाच वर्षात मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी चांगल्या घोषणा केल्या. पण, त्या घोषणाच ठरल्या. खरिपाचा विमा मंजूर.. इतके कोटी आले? रब्बीचा विमा मंजूर, इतके कोटी आले. दुष्काळी अनुदान हेक्टरी ४० हजार असे वृत्तपत्रात किंवा टीव्हीवर ऐकायला मिळते. परंतु बँकेत पासबुकवर एंट्री मारून पाहिले की त्यात काहीच दिसत नाही. मग मंजूर झालेले एवढे कोटी गेले कुठे? असा सवाल या प्रवाशाने व्यक्त केला. परंतु त्याने अनुदान मात्र नुकतेच जमा झाल्याने सांगितले.
बीड जिल्ह्यात यंदा भीषण दुष्काळाचे सावट आहे. गेल्या वर्षापासून शेतकऱ्यांच्या शेतात कसलेच धान्य पिकले नाही. त्यामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत आहे. गावोगावी पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे. ही पाणी टंचाई अधिक बिकट होणार आहे. त्यातच लोकसभा निवडणुका आल्याने दुष्काळाकडे कोणाचे लक्ष नाही. यात सर्वसामान्य माणूस, शेतकरी भरडला जातोय. मतदान कोणाला करायचे? सगळे सारखेच आहेत, असे पाटोदा येथील सखाराम गर्जे या शेतकºयाने सांगितले.
गेल्या पाच वर्षापासून बेरोजगारी वाढली आहे. मोदी सरकारने मोठ्या घोषणा केल्या, परंतु त्याची अंमलबजावणी झाली नाही. कुठे काम मागायला गेले तर काम मिळत नाही, अशी खंत चिचोंडीपाटील येथून रोज नगरला कामानिमित्त येणाºया राजू काळे या युवकाने व्यक्त केली.
बीड जिल्ह्यात मोदी सरकारच्या काळात रस्ते, रेल्वेचे मोठे काम झाले. दुष्काळी अनुदान, पीकविम्यातून मोठा निधी मिळाला. तसेच देशाच्या संरक्षणाच्या दृष्टीने मोदी हेच सक्षम नेतृत्व आहे, असे बीडच्या सागर लाटे या तरुणाने सांगितले.