धोकादायक इमारतीत बालकांवर उपचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:50 AM2021-01-13T04:50:29+5:302021-01-13T04:50:29+5:30
अहमदनगर : महापालिकेच्या कै. बाळासाहेब देशपांडे रुग्णालयाची इमारत नगराध्यक्ष बार्शीकर यांच्या काळातील आहे. ही इमारत ५० वर्षांपूर्वीची असल्याने इमारतीचे ...
अहमदनगर : महापालिकेच्या कै. बाळासाहेब देशपांडे रुग्णालयाची इमारत नगराध्यक्ष बार्शीकर यांच्या काळातील आहे. ही इमारत ५० वर्षांपूर्वीची असल्याने इमारतीचे तीन वर्षांपूर्वी स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले. इमारत धोकादायक असल्याचा अहवाल संबंधित एजन्सीने दिला. यावर कळस असा की, या रुग्णालयातील इलेक्ट्रिक वायरिंगही जुनी आहे. वायरिंग बदलण्याचा प्रस्ताव रुग्णालयाने दोन वर्षांपूर्वीच दिला आहे. मात्र, त्यानंतरही या इमारतीत नवजात बालकांवर उपचार सुरूच आहेत. त्यामुळे महापालिका प्रशासन दुर्घटना घडण्याची वाट पाहते आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
भंडारा येथील जिल्हा रुग्णालयाला लागलेल्या आगीत कोवळ्या जिवांचा करुण अंत प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे झाला. या दुर्घटनेमुळे शासकीय रुग्णालयांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सरकारने ही बाब गांभीर्याने घेतली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयांचे फायर ऑडिट व इलेक्ट्रिक ऑडिट करण्याचा आदेश दिला आहे. महापालिकेचे शहरात कै. बाळासाहेब देशपांडे रुग्णालय आहे. हे रुग्णालय प्रसूतीसाठी प्रसिद्ध आहे. या रुग्णालयात दररोज सुमारे १० ते १२ महिलांची प्रसूती होते. या रुग्णालयाची इमारत १९६३ मध्ये उभारण्यात आलेली आहे. ही इमारत जुनी झाल्याने २०१७ मध्ये इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करून घेण्यात आले आहे. संबंधित एजन्सीने रुग्णालयाची इमारत धोकादायक आहे, असे नमूद केलेले आहे. तसा अहवाल महापालिकेला सादर करण्यात आलेला आहे. तसेच रुग्णालयातील इलेक्ट्रिक वायरिंग, बोर्ड, पॅनल जुने झालेले आहेत. हे इलेक्ट्रिक साहित्य बदलण्याचा प्रस्ताव आरोग्य विभागाने विद्युत विभागाला दिलेला आहे. विशेष म्हणजे हा प्रस्ताव मंजूरही झालेला आहे. प्रत्यक्षात वायरिंग बदली गेली नाही. त्यामुळे शॉर्टसर्किट होऊन आग लागण्याची भीती व्यक्त होत आहे.
...
नवीन इमारतीचा प्रस्ताव शासन दरबारी धूळ खात पडून
महापालिकेच्या कै. बाळासाहेब देशपांडे रुग्णालयाची इमारत जुनी झालेली आहे. त्यामुळे रुग्णालयाच्या नवीन इमारतीचा ५ कोटींचा आराखडा शासनाला पाठविण्यात आलेला आहे. त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. नवीन इमारत नसल्याने जुन्या इमारतीतच बालकांवर उपचार केले जातात. नवजात बालकांसाठी रुग्णालयात आयसीयू कक्ष नाही. ऑक्सिजनची आवश्यकता भासल्यास बालकांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात येते.
...
- कै. बाळासाहेब देशपांडे रुग्णालयाच्या इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले आहे. ही इमारत धोकादायक असल्याचा अहवाल एजन्सीने दिलेला आहे. त्यानुसार नवीन इमारतीसाठीचा ५ कोटींचा आराखडा शासनाला पाठविण्यात आलेला आहे.
- श्रीकांत निंबाळकर, उपभियंता
...
कै. बाळासाहेब देशपांडे रुग्णालयाची इमारत जुनी झालेली आहे. इमारतीचे फायर ऑडिट नियमित करण्यात येते. सोमवारी अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलावून ऑडिट करण्यात आले आहे; परंतु वायरिंगचा प्रस्ताव विद्युत विभागाला पाठविण्यात आलेला आहे. हा प्रस्ताव दोन वर्षांपूर्वीच पाठविण्यात आलेला आहे.
- डॉ. सतीश राजूरकर, वैद्यकीय आरोग्य अधिकारी
....
सूचना फोटो: साजिदने दिलेला आहे.