महामर्गावरील वृक्ष तोडून टाकली विद्युत वाहिनी; ठेकेदारावर कारवाईची माणगी
By अरुण वाघमोडे | Published: December 16, 2023 03:47 PM2023-12-16T15:47:05+5:302023-12-16T15:47:46+5:30
संबंधित ठेकेदारावर कारवाई न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
अहमदनगर: पारनेर तालुक्यात नगर-कल्याण महामार्गावर माळकुप ते भाळवणी शिवारात बेकायदेशीररित्या वृक्षतोड करून नियमाचे उल्लंघन करून विद्युत वाहिनीचे काम करणाऱ्या ठेकेदारावर गुन्हा दाखल करुन त्याचा परवाना रद्द करण्याची मागणी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने करण्यात आली आहे. या संदर्भात समितीचे जिल्हाध्यक्ष अरुण रोडे व पारनेर तालुकाध्यक्ष निवृत्ती कासुटे यांनी जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक व वन विभाग कार्यालयाकडे तक्रार केली आहे. संबंधित ठेकेदारावर कारवाई न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
पारनेर तालुक्यातील माळकुप ते भाळवणी परिसरात नगर-कल्याण राष्ट्रीय महामार्गावर नियमांचे उल्लंघन करुन ठेकेदार ३३/११ के.व्ही. विद्युत वाहिनी टाकण्याचे काम करत आहे. संबंधित ठेकेदाराने सामाजिक वनीकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, जमीन धारक शेतकऱ्यांची पूर्वपरवानगी न घेता मनमानीपणे काम सुरू केले आहे. सदरचे काम रोड पासून ३० फूट अंतरावर विद्युत पोल रोवणे नियमाने होते, परंतु ते फक्त १० फुटावर लावण्यात आले आहे. हे स्थानिक शेतकरी व प्रवाशांसाठी धोक्याचे असून, भविष्यात दुर्घटना घडून जीवितहानी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. ठेकेदाराने अनेक शेतकऱ्यांच्या शेतजमीत जाण्यास जागा ठेवली नसून, झाडे तोडून रस्त्याच्या कडेला टाकण्यात आली आहेत. तोडलेली झाडे रस्ता वाहतुकीस अडथळा ठरत आहे. संबंधित ठेकेदाराने जाणीवपूर्वक रस्त्यामध्ये प्रवाश्यांना अडथळा निर्माण होईल अशा पद्धतीने लाईन टाकली आहे. झालेल्या वृक्षतोडीचा अद्यापि पंचनामा झालेला नसून, त्यात सामाजिक वनीकरण विभागाने त्या ठेकेदाराशी संगणमत केल्याने पंचनामा होऊ शकला नसल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे.