उद्यान विभागाला डावलून कचरा डेपोत लावली झाडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 04:37 AM2021-02-18T04:37:50+5:302021-02-18T04:37:50+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क अहमदनगर : शहरातील वृक्ष लागवडीचे नियोजन उद्यान विभागाकडून होते. बुरुडगाव येथील कचरा डेपोत मात्र उद्यान विभागाला ...
लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर : शहरातील वृक्ष लागवडीचे नियोजन उद्यान विभागाकडून होते. बुरुडगाव येथील कचरा डेपोत मात्र उद्यान विभागाला डावलून रोपांची लागवड करण्यात आली आहे. यावर कळस असा की हे काम दहा टक्के झालेले असतानाच बिलासाठी प्रस्ताव पुढे पाठविण्यात आल्याचे एका तक्रारीवरून समोर आले आहे.
महापालिकेच्या बुरुडगाव येथील कचरा डेपोत प्रदूषण होते. हे प्रदुषण रोखण्यासाठी राष्ट्रीय हरित लवादाने कचरा डेपोभोवती हरित पट्टा विकसित करण्याचा आदेश दिला होता. हा प्रस्ताव उद्यान विभागाकडून सादर होणे अपेक्षित होते. परंतु, बांधकाम विभागाकडून हा प्रस्ताव सादर केला गेला. वृक्ष लागवडीचे नियोजन करण्यासाठी महापालिकेत वृक्ष अधिकारी आहेत. ते ही या कामाबाबत अनिभज्ञ आहेत. त्यांना या कामाची माहिती दिली गेली नाही. परस्पर कचरा डेपोत वृक्ष लागवड करण्यात आली. वृक्ष लागवडीबाबत वनविभागाचे नियम आहेत. विशेष म्हणजे हरित लावादाने १२ फूट उंचीची झाडे लावण्याचा आदेश दिला होता. मात्र महापालिकेने हरित लवादाच्या आदेशाला केराची टोपली दाखवित १ ते २ फुटांचीच झाडे लावली. कचरा डेपोत वृक्ष लागवड सुरू असताना या भागातील रहिवासी राधाकिसन कुलट यांनी कामाची पाहणी केली. हे काम अंदाजपत्रकानुसार केले जात नसल्याबाबत आयुक्तांकडे तक्रार केली. मात्र याही तक्रारीची दखल महापालिकेने घेतली नाही. उलटपक्षी ठेकेदाराचे बिल अदा करण्यासाठीचा प्रस्ताव आयुक्तांना सादर केला गेला. विकास कामांच्या बिलांसाठी पाठपुरवा करूनही वेळेवर बिले मिळत नाहीत. वृक्ष लागवडीचे बिल मात्र तत्काळ अदा केले गेले. महापालिकेच्या अधिकाऱ्यांना एवढी का घाई का झाली होती, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.
...
तक्रारीनंतरही बिल केले अदा
कचरा डेपोत होणाऱ्या प्रदूषणाचा त्रास या भागातील शेतकऱ्यांना होतो. हे प्रदूषण कमी करण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे. त्यामुळे येथील शेतकरी या कामावर लक्ष ठेवून असतात. शेतकरी राधाकिसन कुलट यांनी प्रदूषणाबाबत हरित लवादाकडे तक्रार केलेली आहे. त्यांच्या तक्रारीवरून हरित लवादाने कचरा डेपोमध्ये हरित पट्टा विकसित करण्याचा महापालिकेला आदेश दिला होता. त्यानुसार पालिकेने निविदा काढून ठेकेदारामार्फत वृक्ष लागवड सुरू केली. या कामाची कुलट यांनी पाहणी केली व वस्तुस्थिती मनपाच्या निदर्शनास आणून दिली. मात्र त्याची दखल न घेता बिल अदा केले गेले.
...
पैसे अधिकाऱ्यांकडून वसूल करा
कचरा डेपोत नियम डावलून वृक्ष लागवड करण्यात आली आहे. उद्यान विभागाच्या अधिकाऱ्यांकडून कामाची पाहणी होऊन न्यायालयाच्या आदेशानुसार झाडे लावली आहेत किंवा नाही, याची तपासणी होणे अपेक्षित होते. परंतु, उद्यान विभागाला डावलून हे काम करण्यात आले असून, या कामाची चौकशी करावी. चाैकशीत दोषी आढळलेल्या अधिकाऱ्यांकडून पैसे वसूल करावेत, अशी तक्रार आयुक्त तथा जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्याकडे करण्यात आली आहे.
शशिकांत चंगडे, अध्यक्ष, ज्येष्ठ नागरिक मंच