दौंड मनमाड रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाची चाचणी, बेलापूर ते पुणतांबा काम पूर्ण
By शिवाजी पवार | Published: April 4, 2023 02:04 PM2023-04-04T14:04:04+5:302023-04-04T14:06:32+5:30
मार्गावरील एकूण ८१ किमी अंतराची चाचणी पूर्ण झाल्याची माहिती उपमुख्य अभियंता दीपक कुमार यांनी दिली.
श्रीरामपूर (जि. अहमदनगर) : दौंड-मनमाड रेल्वेमार्गावरील दुहेरीकरणाच्या कामातील बेलापूर ते पुणतांबा या २१ किलोमीटर अंतराची चाचणी घेण्यात आली आहे. लवकरच नगर ते मनमाड पर्यंतचे काम पूर्ण होणार असून यामुळे रेल्वे प्रवास जलद होणार आहे. शिर्डीला येणाऱ्या भाविकांनाही त्याचा लाभ होणार आहे.
दौंड मनमाड रेल्वेमार्गावर गाड्यांना आता विजेवरील इंजिनचा वापर होत आहे. गेल्या तीन वर्षांपासून नगर ते मनमाड दुहेरीकरणाचे काम सुरू आहे. यापूर्वी कोपरगाव ते येवला व येवला ते अंकाई, अंकाई ते अंकाई किल्ला, अंकाई किल्ला ते मनमाड, कोपरगाव ते कान्हेगाव या मार्गाची यशस्वी चाचणी घेण्यात होती.
मार्गावरील एकूण ८१ किमी अंतराची चाचणी पूर्ण झाल्याची माहिती उपमुख्य अभियंता दीपक कुमार यांनी दिली. दौंड ते मनमाड रेल्वे मार्गात नगरच्या रेल्वे स्थानकाचा महत्वपूर्ण टप्पा येतो. मात्र त्यावर एकेरी मार्ग असल्यामुळे रेल्वेगाड्यांचा वेग मर्यादित राहत होता. दोन गाड्या एकाच वेळी मार्गावर आल्यास एका गाडीला थांबा द्यावा लागत होता. त्यामुळे अनावश्यक वेळ खर्च होत होता.
आता मात्र दुहेरीकरणाचे काम वेगाने सुरू आहे. २०२३ अखेर काम पूर्ण करण्याचा रेल्वे प्रशासनाचा प्रयत्न आहे. त्यामुळे रेल्वे ताशी १२५ प्रति किमी वेगाने धावणार आहे. पहिल्या टप्प्यात नगर ते मनमाड व दुसऱ्या टप्प्यात नगर ते दौंड असे काम पूर्णत्वास येणार आहे.
अशी झाली चाचणी
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बेलापूर ते पुणतांबा दुहेरीकरणाच्या कामाची चाचणी पार पडली. यावेळी रेल्वे सुरक्षा आयुक्त मनोज अरोरा, मुख्य प्राशकीय अधिकारी विवेककुमार गुप्ता, मुख्य अभियंता दिनेश कटारिया, उप मुख्य अभियंता दीपक कुमार, कार्यकारी अभियंता संदीप सिन्हा ,कार्यकारी अभियंता डी. पी. पटेल, अभियंता धर्मेंद्र कुमार, सुधांशू कुमार, प्रगती पटेल उपस्थित होते.