आदिवासी समाजाला डिसेंबर अखेरपर्यंत वनजमीन देणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2018 04:01 PM2018-09-30T16:01:44+5:302018-09-30T17:32:59+5:30
राज्यातील आदिवासी समाजाला डिसेंबर २०१८ अखेरपर्यंत वनजमीन पट्टे देण्याचे काम पूर्ण करण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
शिर्डी : राज्यातील आदिवासी समाजाला डिसेंबर २०१८ अखेरपर्यंत वनजमीन पट्टे देण्याचे काम पूर्ण करण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
शिर्डी येथील वीर राघोजी भांगरे नगर येथे अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रम आयोजित अखिल भारतीय कार्यकर्ता संमेलनात ते बोलत होते. यावेळी अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रमचे अध्यक्ष जगदेवराम ओराम, मेघालयचे माजी राज्यपाल रंजीत शेखर मुशाहारी, महंत रामगिरीजी महाराज, श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेचे अध्यक्ष सुरेश हावरे, स्वागत समितीचे अध्यक्ष सुरेश कोते, पद्मश्री लक्ष्मीकुटी अम्मा, निलीमा पट्टे, डॉ. दासरी श्रीनिवासन, कल्याण आश्रमाचे अध्यक्ष लक्ष्मणराव टोकले, कमलचंद भजदेव उपस्थित होते.
फडणवीस म्हणाले, राज्यातील आदिवासी समाजाच्या विकासासाठी राज्य शासनाने विविध निर्णय घेतले आहेत. आदिवासी क्षेत्रात विविध विकासकामांच्या माध्यमातून आदिवासी समाजाला सक्षम बनविण्याचे प्रयत्न सुरु आहेत. पेसा कायदा लागू करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरले असून त्यानुसार पाच टक्के निधी थेट ग्रामपंचायतींना देण्यात येत आहे. आदिवासी मुलामुलींना चांगल्या शाळेत प्रवेश मिळावा, यासाठी योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. आदिवासींना जमीन अधिकार प्राप्त व्हावा, यासाठी राज्य शासनाने पुढाकार घेतला असून डिसेंबर अखेरीस जमीन पट्टे देण्याची कार्यवाही पूर्ण करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
आदिवासी समाजाने आपली संस्कृती जतन करण्याचा प्रयत्न केला असून ब्रिटीशांच्या आक्रमणानंतरही त्यांनी आपली भाषा, संस्कृती आणि परंपरा टिकवून ठेवली आहे . छत्रपती शिवाजी महाराज आणि इंग्रजांच्या काळात अदिवासी बांधवानी पराक्रम गाजविला. जल, जमीन आणि जंगलाच्या अधिकारासाठी बिहारमधील तिखामाजी, महाराष्ट्रातील बाबुराव शरमाके, बिरसा मुंडा आदींनी अपार साहस दाखवले, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले. देशात विविध भाषा, परंपरा आहेत, मात्र विविधतेतून एकता हे देशाचे वैशिष्ट्य आहे. हे वैशिष्ट्य जपत वनवासी कल्याण आश्रमाने शिक्षण आणि संस्कृतीच्या प्रसारात महत्वाचे योगदान दिले. ब्रिटीशांनी शिक्षणापासून जाणीवपूर्वक दूर ठेवलेल्या वनवासी समाजाला वनवासी कल्याण आश्रमाने शिक्षणाशी जोडले. त्यांच्या मुलभूत क्रीडा कौशल्याला वाव दिला. त्यामुळे विविध क्रीड़ा प्रकारात या समाजातील तरुण-तरुणी देशाचे नाव उंचावताना दिसतात, असे ते म्हणाले.तत्पूर्वी फडणवीस यांनी श्री साईबाबा समाधी मंदिरात जाऊन दर्शन घेतले.