कोरोनात आदिवासी गावांना वालीच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:20 AM2021-05-26T04:20:59+5:302021-05-26T04:20:59+5:30
कोतूळ : अकोले तालुक्यातील आदिवासींचा गड असलेल्या चाळीस गावांत वीस हजार आदिवासी गावांतील गोरगरिबांना कोरोना महामारीत कोणी वालीच ...
कोतूळ : अकोले तालुक्यातील आदिवासींचा गड असलेल्या चाळीस गावांत वीस हजार आदिवासी गावांतील गोरगरिबांना कोरोना महामारीत कोणी वालीच उरला नाही. त्यामुळे आलिशान आश्रमशाळा आणि स्वतंत्र बजेट कशासाठी, हा प्रश्न निर्माण झाला आहे.
अकोले तालुक्यातील राजकारणात विकासाच्या नावाखाली राजकीय कलाटणी देणारा चाळीस गाव डांग भागाचा गड सातेवाडी जिल्हा परिषद गट आहे. केळी, सातेवाडी, खेतेवाडी, मोरवाडी, नागमाळ , त्रीसुळवाडी, पळसुंदे, फोपसंडी, सोमलवाडी, अबिटखिंड, कोहणे, कोथळे, शिळवंडी, घोटी, वागदरी, विहीर, शिंदे, लव्हाळी, पाचनई, तळे, खडकीसह सर्वच कोरोना जोरावर आला आहे. येथील गोरगरीब जनतेला कोतूळ, ब्राह्मणवाडा, अकोले, पैठण येथील कोरोना उपचार केंद्रांत जावे लागते.
अकोले तालुक्यातील सर्वात आलिशान तीन ते चारमजली आश्रमशाळा, पंधरा हजार किमतीचा एक असे चार-पाच हजार बेड, गरम पाणी, स्वयंपाकगृह, भांडी, अन्नधान्य, पाणीवाला, आचारी, आरोग्य कर्मचारी असा मोठा नोकरवर्ग किमान दहा हजार रुग्णांची व्यवस्था होईल, इतक्या सुविधा आहेत. राज्यात स्वतंत्र आर्थिक बजेट, महामंडळ, दरवर्षी शंभर दीडशे कोटींच्या योजना तालुक्यात देणारे प्रकल्प कार्यालय आहे, तर गोरगरीब आदिवासी बांधवांना कोतूळ अकोलेतील तरुणांनी लोकवर्गणीतून चालविलेल्या कोरोना केंद्रात उपचार घ्यावे लागत असल्याचे चित्र आहे.
एका बाजूला आदिवासींच्या नावावर राज्यात राजकीय प्रतिष्ठा मिळविली जाते, तर दुसरीकडे त्यांना महामारीत वाऱ्यावर सोडले जाते. पारनेरचे आमदार नीलेश लंके यांचे राज्यातील दिशादर्शक आरोग्य मंदिर लोक मदतीने चालते? इथे आमदारही त्याच सत्ता पक्षातले, शिवाय प्रकल्प कार्यालयही ताब्यात आहे. मग आदिवासींची ससेहोलपट का? याला मात्र कोरोना केंद्रातील उद्घाटनासाठी पहाटेच पळणारे आदिवासी समाजातील नेते की, प्रकल्प अधिकारी जबाबदार?
............
मी पैठण गावात छोटेसे कोरोना उपचार केंद्र लोकवर्गणीतून चालवतो. कोतूळ, ब्राह्मणवाडा, अकोले येथेही आदिवासी भागातील लोक उपचारासाठी जातात. मोलमजुरी आणि आर्थिक परिस्थिती नसल्याने त्यांचे हाल पाहावत नाहीत.
- नीलेश तळेकर, समन्वयक, पैठण कोरोना उपचार केंद्र
.............................
अनेक वेळा आमदार, प्रकल्प अधिकारी व संबंधिताना तोंडी व निवेदनाने सातेवाडी, केळी, कोहणे येथे कोरोना सेंटर व्हावे, म्हणून मागणी केली. मात्र, अजूनही कोणी दखल घेईना.
- सदाशिव कचरे, आदिवासी समाज सेवक, सातेवाडी
250521\images (14).jpeg
सातेवाडी जिल्हा परिषद गट फोटो