जिल्ह्यात एटीएम कार्ड क्लोन करणा-या टोळ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2019 04:12 PM2019-03-16T16:12:54+5:302019-03-16T16:13:06+5:30
आॅनलाईन फसवणुकीच्या गुन्ह्याचे प्रमाण वाढत असताना आता एटीएम क्लोन करून चोरट्यांनी बँक ग्राहकांच्या पैशावर डल्ला मारण्यास सुरूवात केली आहे़
अरुण वाघमोडे
अहमदनगर : आॅनलाईन फसवणुकीच्या गुन्ह्याचे प्रमाण वाढत असताना आता एटीएम क्लोन करून चोरट्यांनी बँक ग्राहकांच्या पैशावर डल्ला मारण्यास सुरूवात केली आहे़ जिल्ह्यातील राहाता, राहुरी व संगमनेर शहरात गेल्या आठ दिवसांत दहा जणांची अशा पद्धतीने फसवणूक झाल्याचे समोर आले आहे़
फसवणूक झालेल्या नागरिकांनी येथील सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे़ एटीएम मशीनमध्ये स्किमर लावून अशी स्मार्ट चोरी करणाऱ्या टोळ्या या परराज्यातील असल्याचे सायबर पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे़ राहुरी येथील सहा, राहाता दोन तर संगमनेर येथील दोन ग्राहकांचे एटीएम क्लोन करून त्यांच्या खात्यातून चोरट्यांनी पैसे काढले आहेत़ सर्व ग्राहकांची मिळून सहा ते सात लाख रुपयांची ही रक्कम आहे़ विशेष म्हणजे या बँक ग्राहकांचे एटीएम क्लोन केल्यानंतर चोरट्यांनी बनावट एटीएम तयार करून त्यांच्या खात्यातून दिल्ली, नोयडा, सिल्वासा येथील एटीएममधून पैसे काढले आहेत़
पैसे घरात ठेवले तर चोरीची भीती, खिशात ठेवले तर खिसेकापूंची भीती त्यामुळे नागरिकांनी एटीएम कार्डचा वापर करणे सुरू केले आहे़ आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून एटीएम कार्डाचाच डेटा चोरी करण्याची पद्धत चोरट्यांनी वापरण्यास सुरुवात केल्याने आता एटीएममधून पैसे काढणेही धोक्याचे ठरू लागले आहे़
चोरटे एटीएम रुममध्ये हिडन (न दिसणारा) कॅमेरा लावतात़ ग्राहक एटीएममध्ये पैसे काढण्यास गेल्यानंतर
प्रथम मशीनमध्ये कार्ड टाकतो त्यानंतर पीन क्रमांक प्रेस केला जातो़
या दोन्ही प्रक्रिया चोरट्यांच्या कॅमेºयात कैद होतात़
एटीएम मशीनवर पीन क्रमांक
प्रेस करण्याचा जो कि बोर्ड असतो त्याच्यासमोर चोरटे एक पॅड (स्किमर) लावतात़ त्याला छोटा कॅमेरा बसविलेला असतो़ या कॅमेºयात एटीएमचा पीन स्कॅन होतो़
एटीएम मशीनमध्ये कार्ड टाकण्याच्या ठिकाणी चोरटे स्किमर बसवितात़ कार्ड टाकल्यानंतर हे कार्ड पूर्ण क्लोन होते़ एटीएम कार्डाचा डेटा हातात आल्यानंतर चोरटे बनावट एटीएम कार्ड तयार करून घेतात़ चोरलेल्या पासवर्डचा वापर करून देशभरातील कुठल्याही एटीएम मशीनमधून चोरटे ग्राहकांच्या खात्यातून पैसे काढून घेतात़ राहुरी, राहाता आणि संगमनेर येथे याच पद्धतीने एटीएम कार्ड क्लोन करून ग्राहकांची फसवणूक करण्यात आली आहे़
नागरिकांनी एटीएममधून पैसे काढताना आपला पीन क्रमांक कुणाला दिसणार नाही याची दक्षता घ्यावी़ त्या एटीएम मशीनला कुठे स्किमर लावलेले आहे का? याची खात्री करावी, अनोळखी व्यक्तीच्या हातात आपले एटीएम कार्ड देऊ नये, फसवणूक झाली तर तत्काळ सायबर पोलीस ठाण्याशी संपर्क करावा़ -प्रतीक कोळी, पोलीस उपनिरीक्षक, सायबर पोलीस ठाणे