आदिवासींचा ‘राज्जो’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2019 03:43 PM2019-08-17T15:43:36+5:302019-08-17T15:44:00+5:30
तेव्हाची गोष्ट. यशवंतराव भांगरे यांचे निधन झालेले. अंत्यविधी शेंडीला प्रवरेकाठी. भंडारद-याच्या भिंतीतून पाणी पाझरावं तशी माणसं, बाया, बापडे, मुले, म्हातारे, म्हाता-या, अवघा जनसैलाब अंत्यविधीच्या ठिकाणाकडं ओघळत होता. त्यातलीच एक म्हातारी ‘बाबा आम्हाली राज्जो गेलाय रं आज’ असं म्हणून रडत रडतच चालली होती. आदिवासींसाठी ते ‘राज्जो’ म्हणजे राजा होेते़ म्हणूनच असंख्य आदिवासींनी एकच हंबरडा फोडला होता.
अहमदनगर : आदिवासी माणसांवर या भांगरे घराण्याचं कायमच गारुड राहिलं. अकोल्याचे पहिले आमदार कै. गोपाळराव भांगरे यांच्या अकाली निधनानंतर तो आमदरकीचा वारसा कै. यशवंतराव भांगरे यांच्याकडे आला. नंतर १९६२, १९७१, १९७८ असे तीनदा यशवंतरावांना अकोल्याचा आमदार (राजा) केलं. या घराण्यावर लोकांनी मनमुराद प्रेम केलं. पण असे प्रेम करताना कित्येक पट प्रेम या भांगरे घराण्यानं अकोल्याच्या जनतेवर पिढ्यान्पिढ्या केलेलं होतं. करत आले होते. त्यामुळे साहजिकच अकोल्याच्या आदिवासींच्या मनात या घराण्याला राजेपदाचा मान मिळाला आहे. आतापर्यंत या परंपरेला या घराण्याचे आजचे वारस अपवाद ठरले नाहीत, हे विशेष!
भांगरे घराणे तसे प्रकाशात आले ते आमदार यशवंतरावांमुळे. तीनदा आमदार झाले. लोकप्रिय आमदार झाले. निरागस, भाबडं आणि मुख्य म्हणजे भीडस्त व्यक्तिमत्त्व. जेमतेम शिक्षण झालेलं. लोकांशी वागण्यात अत्यंत सभ्य़ ओळख असू-नसू सर्वांना ओळख दाखवणार. अत्यंत आदबीने नमस्कार स्विकारण्यास त्याच्याजवळ थांबणार. त्याची विचारपूस करणार. त्या काळात अकोल्यात ते पायी फिरत. ते इतके भीडस्त की, कुणी काहीही मागा ते कधीच कुणाला नाही म्हणायचे नाहीत. एकदा पीएच.डी. करणारे आमचे शिक्षक त्यांच्याकडे गेले व म्हणाले, ‘माझे पीएच.डी.चे काम आहे. वेळ हवाय.’ ते म्हणाले, ‘मुंबईला या़ आपण तुमचे काम करून टाकू.’ मग आमच्या शिक्षकांनी त्यांना कामाचे स्वरुप सांगितले व त्यांची मुलाखत घेतली.
खरं तर यशवंतराव १९६२ चे आमदार. तेव्हाचे आमदार आजच्यासारखे नव्हते. अजून सत्तेचे विकेंद्रीकरण व्हायचे होते. कल्याणकारी राज्याची कल्पना अजून विस्तारायची होती. ना आमदार निधी, ना अन्य प्रकारचा निधी. आजचा जि.प. सदस्य त्यांना जड होता. आमदारांचे प्रमुख काम काय तर व्यक्तिगत कामे. विधिमंडळात लोकांचे जमेल तसे प्रश्न मांडणे. दुर्दैवाने तेव्हा मीडिया अगर अन्य साधने नव्हत्यात जमा होती. त्यामुळे यशवंतरावांची तत्कालीन कारकीर्द फारशी लोकांपुढे येऊ शकली नाही. किंवा त्याबाबत फारशी माहिती उपलब्ध होऊ शकत नाही. त्यांचे तत्कालीन बहुतांश सहकारी आज हयात नाहीत. तरीसुद्धा अकोल्याचे कॉलेज, अगस्ती सहकारी साखर कारखाना, अकोल्याचा दूध संघ त्यांच्या कार्याची साक्ष देत उभे आहेत़
मला या पिढीच्या कामाचे मूल्यमापन वेगळ्या पद्धतीने करायला आवडते. म्हणजे ते तसेच केले जाईल. अकोले तालुका म्हणजे दीर्घकाळ डाव्यांचा गड होता. स्वातंत्र्यानंतर या मतदारसंघातून दोनदा डावे निवडून आले. १९५७ आणि १९६७. अन्यवेळी सदा सर्वदा काँग्रेस निवडून आली.
गावेच्या गावे कम्युनिस्टांची व पीएसपीवाल्यांची होती. १९६७ पर्यंतचा तो काळ! तालुक्यात कम्युनिस्टांचे बी. के. देशमुख, कॉ. बुवासाहेब नवले, धर्मा भांगरे असे शेकडो कडवे कार्यकर्ते होते. तर पीएसपीचे अमृत मेहता, भास्करराव दुर्वे नाना, दशरथ सावंत, नारायण देशमुख असे मोठे नेते कार्यरत होते. संयुक्त महाराष्टÑ समितीने (१९५७) ग्रामीण काँग्रेस जवळजवळ हद्दपार केली होती. मुंबईत १०५ हुतात्मे करणाºया काँग्रेस सरकारला जनतेने गुन्हेगार ठरविले होते. तेव्हा काँग्रेस पक्षात राहणे किंवा स्वत:ला काँग्रेसी सांगणे ही तितकी सोपी गोष्ट नव्हती. त्या काळात अकोल्याचे भांगरे घराणे काँग्रेसमध्ये होते. यशवंतराव भांगरे काँग्रेस पक्षाची धुरा सांभाळत होते. उपरोक्त दिग्गज नेत्यांशी टक्कर घेत होते. काँग्रेसचा झेंडा आणि बैलजोडीचे चिन्ह घेऊन गावोगाव हिंडत होते. लोकप्रिय होत होते. पुढे १९६२ ला ते काँग्रेस पक्षातून आणि अकोलेसारख्या डाव्यांच्या बालेकिल्ल्यातून निवडून आले. याचे सर्वात जास्त कौतुक तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना वाटले. त्यांना खूप आनंद झाला आणि यशवंतरावांनी अकोल्याच्या आमदारांना विचारले, ‘‘काय बक्षिसी देऊ?’’ तेव्हा यशवंतराव भांगरे म्हणाले, काय नाही साहेब तुमच्या सोबत एक फोटो काढा माझा. ‘तो’ तोच फोटो जो यशवंतराव भांगरे यांच्या शेंडीतील चौमौळी घरात दीर्घकाळ दिसत होता. असे कित्येक गंमतीदार प्रसंग लोक सांगत असतात.
स्वातंत्र्यानंतर काँग्रेस सत्तेवर होती़ तरी तिच्यावर मजबूत पकड भांडवलदारांची होती. सत्ताधाºयांना वाटले म्हणून ते काहीही करू शकत नव्हते. तेव्हाच्या काँग्रेसचे वर्तन ‘राईट टू सेंटर’ असे होत होते. परंतु त्याचवेळी काँग्रेसमध्ये कायम एक डावा गटही कार्यरत होता. यात महाराष्टÑातील यशवंतराव भांगरेंसारखी माणसे होती. संगमनेरचे बी. जे. खताळ होते. शेवटी ७० च्या दशकात काँग्रेसमध्ये याच मुद्यावर फूट पडली व काँग्रेसचा हा संघर्ष काही काळापुरता थांबला. त्यामुळे आपल्याला बँकांचे राष्ट्रीयीकरण वगैरे पहायला मिळाले. बाकीचा इतिहास सर्वज्ञात आहे.
म्हणायचे असे की, याचा विचार करून तत्कालीन पिढीचे मूल्यमापन करावे लागेल. विधानसभेत त्याही काळात काही पुरोगामी कायदे संमत झाले़ त्याचे श्रेय यशवंतराव भांगरे यांच्यासारख्या आमदारांना जाते.
तशी आमची पिढी बहुतांश अॅन्टी काँग्रेस! अनेक काँग्रेस नेत्यांचा आम्हाला कायम राग यायचा. आमदार भांगरे यांच्याशी माझा असा परिचय नव्हता. मात्र त्यांच्याबद्दल आम्हाला आदर वाटायचा. कारण आपल्या स्वभावाने त्यांनी जग जिंकले होते़
१९६७ साली ते पराभूत झाले़ संध्याकाळी शेंडीच्या बसची वाट पहात स्टँडच्या कंट्रोल रूममध्ये आम्ही थांबले होतो. आम्ही शाळकरी मुलांनी त्यांना पाहिले व आमच्यातील एक ‘वाढीव’ मुलगा म्हणाला, ‘या पराभूत उमेदवारावर परीक्षेला निबंध आला तर...’ यशवंतरावांनी ते ऐकले की, नाही ते समजले नाही. पण आम्हा सर्व पाच-सात मुलांना त्यांनी चहा पाजला़ पुढे बºयाच वर्षांनी माझ्या पुतणीचे लग्न होते. निमंत्रण काही नव्हते. ते तेव्हा आमदारही नव्हते. पण लग्न लागल्यानंतर पाहतो तो समोर यशवंतराव भांगरे. तो फोटो मी अद्यापपर्यंत जपून ठेवला आहे. त्यांनी त्यांच्या आयुष्यात साधेपणा जपून ठेवला, तसा त्यानंतर त्यांच्या साध्याभोळ्या व्यक्तिमत्त्वाचा मला लळा लागला़ साºयाच भांगरे घराण्याचा लळा लागला, तो असा.
त्यांचे अंत्यदर्शन घेतले तेव्हा त्यांचा निष्प्रभ देह, निस्तेज होऊन त्याच चौमौळी घरासोर ठेवला होता. आसपास ना संपत्तीच्या, ना वैभवाच्या, ना सुबत्तेच्या खुणा होत्या. मिटलेल्या डोळ्यांमध्ये प्रेमळ गायीची कणव वाहत होती. कळसूबाईच्या पायथ्याचा हा राजा त्याच्या प्रेमळ प्रजेला सोडून गेला होता. ती आता पोरकी झाली होती.
शेंडीला गेलं की तिथल्या शाळेपुढे कै. आमदार यशवंतराव भांगरे यांचा अर्धपुतळा आहे. शेंडी आता तेव्हाची राहिली नाही. बदलतेय. आधुनिकतेचे वारे तिथे वाहतेय़ पण यशवंतरावांच्या तेव्हाच्या दिवसांची आठवण काही पुसता पुसत नाही़
जन्म : ९ आॅक्टोबर १९३५
गाव : शेंडी-भंडारदरा (ता. अकोले)
निधन : ३१ जानेवारी १९८२
भूषविलेली पदे
- १९६२- ६७ : विधानसभा सदस्य
- १९६३ : आदिवासी उन्नती सेवा मंडळाची स्थापना
- १९७२ : अगस्ती साखर कारखान्याचे मुख्य प्रवर्तक
- १९७२ व १९७७ : पुन्हा आमदार म्हणून निवड
- १९७४ : तालुका एज्युकेशन सोसायटीच्या स्थापनेत सहभाग
- भूविकास बँकेचे अध्यक्ष
- एस.टी.महामंडळ संचालक
- आदिवासी क्षेत्रात १० गावात आश्रमशाळा काढल्या
लेखक - शांताराम गजे(मुक्त पत्रकार व अभ्यासक़)