जिल्हा परिषद शोकसभेत अपघातातील मृतांना श्रद्धांजली
By चंद्रकांत शेळके | Published: May 15, 2023 10:52 PM2023-05-15T22:52:31+5:302023-05-15T22:52:39+5:30
कामाचा कितीही व्याप असला तरी कोणालाही रविवारी कार्यालयात बोलावले जाणार नाही, अशी ग्वाही मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी दिली.
चंद्रकांत शेळके, अहमदनगर: नाशिक येथून प्रशासकीय काम करून परतत असताना जिल्हा परिषदेच्या दोन कर्मचाऱ्यांचा शनिवारी अपघाती मृत्यू झाला. ही न भरून येणारी हानी आहे. परंतु यातून इतर कर्मचाऱ्यांनी बोध घेऊन सक्तीने रात्रीचा प्रवास टाळावा. तसेच कामाचा कितीही व्याप असला तरी कोणालाही रविवारी कार्यालयात बोलावले जाणार नाही, अशी ग्वाही मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी दिली.
शनिवारी नाशिकहून प्रशासकीय काम करून परतत असताना नगर जिल्हा परिषदेचे पशुसंवर्धन विभागाचे कक्ष अधिकारी अशोक व्यवहारे आणि महिला बालकल्याण विभागाचे लिपिक विनायक कातोरे यांचा नगर-मनमाड रोडवर वांबोरी फाट्यानजीक झालेल्या अपघातात मृत्यू झाला. सोमवारी दुपारी या कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषद सभागृहात शोकसभा घेऊन श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शेळके, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी संजय कुमकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे, प्रभारी कॅफो राजू लाकडझोडे, शिक्षणाधिकारी भास्करराव पाटील, जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीचे अध्यक्ष संजय कडूस, सुभाष कराळे, विकास साळुंके, शशिकांत रासकर आदींसह कर्मचारी उपस्थित होते.
या दुर्दैवी घटनेमुळे सर्वच अधिकारी, कर्मचाऱ्यांवरील कामाचा ताण तसेच इतर गोष्टी समोर आल्या आहेत. सुरक्षितता म्हणून प्रत्येकाने रात्रीचा प्रवास टाळलाच पाहिजे. तसेच रविवारी कोणालाही कामावर बोलावण्यात येणार नाही. खूपच तातडीची गरज असेल तर शनिवारी कोणाला बोलावले तर संबंधित खातेप्रमुखानेही उपस्थित राहावे. कामाचे योग्य वाटप व नियोजन केल्यास कोणत्याही कर्मचाऱ्यावर अतिरिक्त ताण येणार नाही. त्यादृष्टीने उपाययोजना कराव्यात, असे निर्देश येरेकर यांनी दिले.
संभाजी लांगोरे यांनी शासनाकडून किंवा जिल्हा परिषदेकडून आवश्यक ती मदत मृतांच्या कुटुंबीयांना देण्याची ग्वाही दिली. कर्मचाऱ्यांनी भावना व्यक्त करताना अतिरिक्त कामाचा ताण कमी करावा, रिक्त पदे भरावीत, अशी अपेक्षा व्यक्त केली.