तृप्ती तुपे खून खटला जलदगती न्यायालयात

By Admin | Published: September 9, 2014 11:08 PM2014-09-09T23:08:53+5:302023-08-24T18:50:49+5:30

पारनेर: लोणी मावळा येथील दहावीतील विद्यार्थिनी तृप्ती तुपे हिचा अत्याचार करून खून केल्याचे प्रकरण जलदगती न्यायालयात चालविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

Tripti Tupe murder case: A fast track court | तृप्ती तुपे खून खटला जलदगती न्यायालयात

तृप्ती तुपे खून खटला जलदगती न्यायालयात

पारनेर: लोणी मावळा येथील दहावीतील विद्यार्थिनी तृप्ती तुपे हिचा अत्याचार करून खून केल्याचे प्रकरण जलदगती न्यायालयात चालविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याप्रकरणी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांशी बोलणे झाल्यानंतर याला गती मिळाली. दरम्यान या प्रकरणात प्रसिध्द वकील उज्ज्वल निकम यांनीसुध्दा सरकारी वकील म्हणून खटला घेण्यास संमती दिल्याची माहिती मिळाली आहे.
अळकुटी येथील साईनाथ विद्यालयातील दहावीतील विद्यार्थिनी तृप्ती तुपे ही आपल्या लोणी मावळा येथील घरी जात असताना तीन नराधमांनी तिचा खून केल्याची घटना मागील महिन्यात घडली होती. यानंतर पोलिसांनी तपास केल्यावर गावातीलच संतोष लोणकर, सुनील लोणकर व विहिरीचे खोदकाम करणारा दत्ता शिंदे यांनी तृप्तीवर अत्याचार करून तिचा खून केल्याचे तपासात उघड झाले होते.
या प्रकरणात राज्य सरकारने लक्ष घालावे यासाठी पारनेर तहसील कार्यालयावर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मोर्चा काढून या घटनेचा निषेध केला होता. व मुख्यमंत्र्यांना व गृहमंत्र्यांना पत्र पाठवून हे प्रकरण जलदगती न्यायालयात पाठवावे व नराधम आरोपींना तातडीने शिक्षा व्हावी अशी मागणी केली होती. त्यानंतर पुन्हा अण्णांनी रविवारी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व गृहमंत्री आर.आर.पाटील यांच्याशी चर्चा केली. त्यावेळी तृप्ती तुपे खून प्रकरण आम्ही जलदगती न्यायालयात चालविण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगितले.
शिवाय उज्ज्वल निकम यांनाही हा खटला चालविण्याची विनंती केल्याचे म्हटले आहे. त्यांच्याकडूनही सकारात्मक प्रतिसाद आल्याचे दोघांनी सांगितले. यामुळे आता या प्रकरणात दोषींना कडक शिक्षा होईल, असा आशावाद व्यक्त होत आहे. (तालुका प्रतिनिधी)
तातडीने शिक्षा व्हावी
लोणी मावळा येथील तृप्ती तुपे या दहावीतील विद्यार्थिनीचा खून झाल्याची घटना मानवतेला कलंक असून त्या नराधमांना तातडीने शिक्षा होण्याची गरज आहे.आपले याकडे सातत्याने लक्ष आहे.
-अण्णा हजारे,
ज्येष्ठ समाजसेवक

Web Title: Tripti Tupe murder case: A fast track court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.