चास शिवारात गळ्याला चाकू लावून ट्रकचालकाला लुटले; महामार्गावर लुटारूंचा धुमाकूळ सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2018 12:59 PM2018-01-24T12:59:21+5:302018-01-24T12:59:43+5:30
मंगळवारी मध्यरात्री नगर-पुणे रोडवरील चास शिवारात तिघांनी ट्रकचालकाच्या गळ्याला चाकू लावून मारहाण करत रोख रकमेसह मोबाईल लुटला.
अहमदनगर : शहरातून जाणा-या महामार्गावर वाहनचालकांना अडवून लुटमारीच्या घटना वाढल्याने रात्रीचा प्रवास धोकादायक बनला आहे. मंगळवारी मध्यरात्री नगर-पुणे रोडवरील चास शिवारात तिघांनी ट्रकचालकाच्या गळ्याला चाकू लावून मारहाण करत रोख रकमेसह मोबाईल लुटला.
नगर शहर व तालुका हद्दीत गेल्या महिनाभरात दहा वाहनचालकांना लुटण्याच्या घटना समोर आल्या आहेत. ट्रकचालक उदयभान सुखलाल पटेल (वय २३ रा. अलाहाबाद, उत्तरप्रदेश) याने चास शिवारातील पेट्रोल पंपाजवळील हॉटेलमधील पार्किंगमध्ये ट्रक पार्क केली होती. पटेल ट्रकच्या केबिनमध्ये झोपला होता. मंगळवारी रात्री तिघांनी पटेल याच्या गळ्याला चाकू लावून त्याला मारहाण केली. तसेच त्याच्याकडील रोख १२ हजार ८०० रूपये व एक मोबाईल चोरून नेला़ या घटनेनंतर पटेल याने नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे़
१५ जानेवारी रोजी बजरंगवाडी (ता. शिक्रापूर जि़. पुणे) येथील मुजमिल हुजूर देशमुख या ट्रकचालकालाही पांढरीपुलाजवळील पेट्रोलपंपावर तिघांनी अशाच पद्धतीने गळ्याला चाकू लावून लुटले होते. यावेळी ३९ हजार ८०० रूपये लंपास केले. पंधरा दिवसांपूर्वी शेंडीबायपास येथे दोघांनी ट्रकचालकाला मारहाण करून पैसे लुटण्याचा प्रयत्न केला. यावेळी घटनास्थळी पोलीस दाखल झाल्याने दोघा चोरट्यांना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यानंतर कल्याण रोडवर एका ट्रकचालकाला चोरट्यांनी मारहाण करून त्यांच्याकडील सहा हजार रूपये व मोबाईल लंपास केला. २० दिवसांपूर्वी बु-हाणनगर परिसरात टेम्पोचालकाला मारहाण करून त्यांचा टेम्पो चोरून नेला होता. महिनाभरात अशा दहा घटना घडल्या आहेत.
एका आरोपीला अटक
चास शिवारात ट्रकचालकाला लुटणा-या तिघांपैकी नगर तालुका पोलीसांनी संतोष रणदिवे (रा. केडगाव) याला अटक केली आहे. या टोळीतील मुख्य आरोपी नितीन पवार हा मात्र फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.