वंचितांच्या सेवेत नाताळचा खरा आनंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:27 AM2020-12-30T04:27:05+5:302020-12-30T04:27:05+5:30
अहमदनगर : प्रेम, दया, शांती व करुणेच्या शिकवणीवर जगभरातील अनेक संस्था निराधार व वंचितांची सेवा करण्यासाठी कार्यरत आहेत. दु:खितांचे ...
अहमदनगर : प्रेम, दया, शांती व करुणेच्या शिकवणीवर जगभरातील अनेक संस्था निराधार व वंचितांची सेवा करण्यासाठी कार्यरत आहेत. दु:खितांचे अश्रू पुसणे हाच खरा मानवता धर्म असून वंचितांच्या सेवेत नाताळाचा खरा आनंद आहे, असे प्रतिपादन सीएसआरडीचे संचालक डॉ. सुरेश पठारे यांनी केले.
अहमदनगर महानगरपालिका व बी.पी.एच.ई. सोसायटीच्या सीएसआरडी इन्स्टिट्युट ऑफ सोशलवर्क ॲण्ड रिसर्च संस्थेद्वारे चालविण्यात येत असलेल्या शहरी बेघर निवारागृहामध्ये नाताळ सण उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी सीएसआरडीचे संचालक डॉ. सुरेश पठारे यांच्यासह निवारागृहाचे व्यवस्थापक सॅम्युअल वाघमारे व नाजीम बागवान उपस्थित होते. निवारागृहातील निराधार वयोवृद्धांनी नाताळ सणाच्या कार्यक्रमात उत्साहात सहभाग नोंदविला. बेघर, निराधार बांधवांसाठी नाताळनिमित्ताने आयोजित विशेष कार्यक्रम आनंदाची पर्वणी ठरला. विविध गाणी, खेळ व मनोरंजनाचा कार्यक्रम घेत सर्वांनी मनमुराद आनंद घेतला. बी.पी.एच.ई. सोसायटी व आयएमएस संस्थेकडून निराधारांना ऊबदार कपडे देण्यात आले. सीएसआरडीच्या वैशाली पठारे यांनी महिलांसाठी पाठविलेल्या साड्या मिळाल्याने महिलांचे डोळे पाणावले.
यावेळेस डॉ. पठारे म्हणाले, बायबलमध्ये सांगितल्याप्रमाणे प्रभू येशू वंचितांच्या उद्धारासाठी या जगात मानवीरूप धारण करून आले होते. त्यांनी आपल्या जीवनकाळात नेहमी निराधार, दु:खी, कष्टी व गरजवंताला आधार देण्याचे कार्य केले. त्यांच्या प्रेम, दया, शांती व करुणेच्या शिकवणीवर जगभरातील अनेक संस्था निराधार व वंचितांची सेवा करण्यासाठी कार्यरत आहेत. दु:खितांचे अश्रू पुसणे हाच खरा मानवताधर्म असून वंचितांच्या सेवेत नाताळचा खरा आनंद आहे.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बेघर निवारागृहातील कर्मचारी लता नाईक, सॅम्युअल नाईक व मयूर बनसोडे यांनी विशेष परिश्रम घेतले.
--------
फोटो - २८ निवारागृह
सीएसआरडी इन्स्टिट्युट ऑफ सोशल वर्क ॲण्ड रिसर्च संस्थेद्वारे चालविण्यात येत असलेल्या शहरी बेघर निवारागृहामध्ये नाताळ सण उत्साहात साजरा करण्यात आला.