घारगावात नव्या राजकारणाची फुंकली तुतारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:28 AM2020-12-30T04:28:53+5:302020-12-30T04:28:53+5:30
श्रीगोंदा : जिल्हा बँकेचे संचालक दत्तात्रय पानसरे यांच्या अभीष्टचिंतन सोहळ्यात नागवडे साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे व जिल्हा परिषदेचे ...
श्रीगोंदा : जिल्हा बँकेचे संचालक दत्तात्रय पानसरे यांच्या अभीष्टचिंतन सोहळ्यात नागवडे साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे व जिल्हा परिषदेचे सदस्य सदाशिवराव पाचपुते एकत्र आल्याने घारगावातून नव्या राजकारणाची तुतारी फुंकली गेली. जिल्हा सहकारी बँक व नागवडे साखर कारखाना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे नेते एकत्र आल्याने उपस्थितांच्या भुवया उंचावल्या आहेत.
घारगाव येथे झालेल्या कार्यक्रमास नागवडे साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष भगवानराव पाचपुते, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष हरिदास शिर्के, राजेंद्र म्हस्के, स्मितल वाबळे, बाळासाहेब महाडीक, टिळक भोस, प्रशांत दरेकर, बापू गोरे, अशोक खेंडके, दिनेश इथापे, दत्तात्रय गावडे, अशोक ईश्वरे, नारायण जगताप, लतिका जगताप उपस्थित होते. मागील जिल्हा बँकेच्या निवडणुकीत माजी आमदार राहुल जगताप व राजेंद्र नागवडे गटाने प्रेमराज भोयटे यांना दत्तात्रय पानसरे यांच्या विरोधात उतरविले. आमदार बबनराव पाचपुते यांच्या मदतीने पानसरेंनी जिल्हा बँकेत एंट्री केली, तेव्हापासून सहकारात गटबाजी पेटली होती. नागवडे साखर कारखान्याचे उपाध्यक्ष केशव मगर यांनी उपाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आणि राजेंद्र नागवडे यांना आव्हान दिले. जिल्हा बँक निवडणुकीत माजी आमदार राहुल जगताप व दत्तात्रय पानसरे यांच्यात लढत जवळपास निश्चित आहे. जिल्हा बँक निवडणुकीत राहुल जगताप उतरणार हे लक्षात येताच दत्तात्रय पानसरे व बाळासाहेब नाहाटा यांनी नागवडेंशी जवळीक करून राहुल जगताप यांना चेकमेट देण्यासाठी डावपेच सुरू केले आहेत. घारगावातील कार्यक्रमातून हे स्पष्ट झाले आहे.
कोण काय म्हणाले..
पानसरेंनी बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मदत केली. त्यामुळे श्रीगोंद्यात सर्वाधिक कर्जमाफी झाली.
-राजेंद्र नागवडे, अध्यक्ष, नागवडे साखर कारखाना.
..........
दत्तात्रय पानसरे हा रांगडा गडी असून जिल्हा बँकेची कार्यपद्धती त्यांनी बदलून टाकली.
सदाशिव पाचपुते, जिल्हा परिषद सदस्य
...........
पानसरे यांनी जिल्हा बँकेत चांगले काम केले. त्याची पावती त्यांना पुन्हा मिळेल.
- भगवानराव पाचपुते, माजी उपाध्यक्ष, नागवडे साखर कारखाना
..........
दत्तात्रय पानसरे व बाळासाहेब नाहाटा यांनी राजकारणात जे ठरविले ते तडीस नेले.
-हरिदास शिर्के, तालुकाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस