हॉटेल लुटण्याचा प्रयत्न
By Admin | Published: September 6, 2014 11:55 PM2014-09-06T23:55:26+5:302023-06-27T13:18:01+5:30
राजूर : धारदार सुऱ्याचा धाक दाखवून दोन अज्ञात चोरट्यांनी येथून जवळच असणाऱ्या केळुंगण खांडीतील हॉटेलचा गल्ला लुटण्याचा प्रयत्न केला.
राजूर : धारदार सुऱ्याचा धाक दाखवून दोन अज्ञात चोरट्यांनी येथून जवळच असणाऱ्या केळुंगण खांडीतील हॉटेलचा गल्ला लुटण्याचा प्रयत्न केला. मात्र या चोरट्यांना चुकवत घाबरलेल्या हॉटेल व्यवस्थापकाने बाहेर पळ काढल्यामुळे त्या चोरट्यांनीही धूम ठोकली.
याबाबत हिरा हॉटेलचे व्यवस्थापक नामदेव लक्ष्मण देशमुख यांनी सांगितले की, दुपारी दोनच्या दरम्यान दोन अज्ञात व्यक्ती रस्त्याच्या कडेला दुचाकी उभी करत माझ्या हॉटेलकडे पळत आले. त्यांनी तोंडाला रूमाल बांधला होता. माझ्या काऊंटरजवळ येत त्यांनी सुरा दाखवत गल्ल्याची चावी मागितली. अचानक सुरा पाहिल्यामुळे घाबरलेल्या व्यवस्थापकाने चावी ठेवली व काऊंटर बाहेर निघाला. याच वेळात व्यवस्थापकाने पुन्हा चावी घेऊन मागील दरवाजाने पळ काढला व तात्काळ पोलिसांशी संपर्क साधला. माहिती मिळताच येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुलकुमार पाटील, हेडकॉन्स्टेबल सुभाष सोनवणे, राहुल रूपवते व चालक अशोक काळे घटनास्थळाकडे रवाना झाले. दरम्यान पाटील यांनी राजूर येथे नाकाबंदी केली व अकोल्यासही नाकाबंदी बाबत कळविले. व्यवस्थापकाच्या वर्णनावरून पोलिसांनी दोघा संशयितांना ताब्यात घेतले, त्यांच्याकडे चौकशी केली असता ते रंधा येथील रहिवाशी असल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान पाटील यांच्यासह पथकाने वाकी, शेंडी, वारंघुशी फाटा, बारीपर्यंत पाहणी केली, मात्र या अज्ञात चोरट्यांचा तपास लागला नाही.
सध्या तालुक्यात होत असलेल्या चोरीच्या प्रकारामुळे गावोगाव घबराट पसरलेली आहे. परिसरातील अनेक गावातील तरुण रात्रभर गस्त घालत आहेत. पाटील यांनीही रात्रपाळीसाठी पोलिसांची संख्या वाढविली आहे. पोलिसांची दोन वाहने रात्रभर परिसरात गस्त घालत आहेत. कोतूळ फाट्यावर नाकाबंदी केली असून, शेंडी येथेही पोलीस रवाना केल्याचे पाटील यांनी सांगितले. (वार्ताहर)