घटनेची मुलभूत चौकटच मोडण्याचा प्रयत्न होतोय; नगर शहरातील संविधान जागर रॅलीत पानसरे यांची टीका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2017 12:35 PM2017-11-27T12:35:07+5:302017-11-27T12:37:44+5:30
जनतेला सार्वभौमत्व संविधानाने दिले. सध्या घटनेची मुलभूत चौकटच मोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. लोकशाहीत व्यक्ती केंद्रता निर्माण होत असून, टोळी प्रवृत्तीच्या विरोधात सर्वांनी एकत्र आले पाहिजे. भक्त न होता डॉ.बाबासाहेबांचा वैचारिक वारसा पुढे चालविण्यासाठी त्यांच्या विचारांचे अनुयायी होण्याची गरज असल्याची भावना कॉ.स्मिता पानसरे यांनी व्यक्त केली.
अहमदनगर : जनतेला सार्वभौमत्व संविधानाने दिले. सध्या घटनेची मुलभूत चौकटच मोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. लोकशाहीत व्यक्ती केंद्रता निर्माण होत असून, टोळी प्रवृत्तीच्या विरोधात सर्वांनी एकत्र आले पाहिजे. भक्त न होता डॉ.बाबासाहेबांचा वैचारिक वारसा पुढे चालविण्यासाठी त्यांच्या विचारांचे अनुयायी होण्याची गरज असल्याची भावना कॉ.स्मिता पानसरे यांनी व्यक्त केली.
संविधान दिनानिमित्त मानवाधिकार जनआंदोलन, प्रेस क्लब, विविध स्वयंसेवी संस्था व पुरोगामी संघटनांतर्फे संविधान जागर रॅली नगर शहरातून काढण्यात आली. त्यावेळी कॉ.पानसरे बोलत होत्या. प्रेस क्लबचे प्रभारी अध्यक्ष मन्सूर शेख, मानवाधिकारचे प्रदेशाध्यक्ष संतोष गायकवाड, बाळासाहेब साळवे, सुहास शेळके, कॉ. बन्सी सातपुते, जिल्हाध्यक्ष प्रदिप काकडे, शरद दारकुंडे, प्रा. सॅम्युअल वाघमारे, प्रा.राहुल पाटोळे, युनूस तांबटकर, बहिरनाथ वाकळे, संदिप शेलार, निलीमा बंडेलू, संध्या मेढे, नादिर खान, महेश महाराज देशपांडे, विजय पठारे, जालिंदर बोरुडे, राजू शेख, सुशांत म्हस्के, अमित काळे उपस्थित होते.
या रॅलीमध्ये पीस फाऊंडेशन, दक्षिणायन सलोखा, दीपस्तंभ प्रतिष्ठान, अखिल भारतीय किसान सभा, महिला फेडरेशन, डायनामिक अकॅडमी, केअरिंग फ्रेन्डस, रमाई महिला मंडळ, अहमदनगर इतिहास प्रेमी मंडळ, क्रांतीसिंह कामगार संघटना, युवक क्रांती दल, जातीय अत्याचार विरोधी कृती समिती, रहेमत सुलतान फाऊंडेशन, अंधश्रध्दा निर्मूलन समिती, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, आरंभ पॅलिएटिव्ह कॅन्सर केअर सेंटर आदी सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.
संविधान जागर रॅलीचा प्रारंभ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मार्केटयार्ड येथील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन झाला. जुने बस स्थानक येथील छत्रपती शिवाजी महाराज व माळीवाडा येथील महात्मा फुले यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन पुन्हा डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ जागर रॅलीचे रुपांतर सभेत झाले. संध्या मेढे यांनी संविधानाच्या प्रास्ताविकाचे वाचन केले.