गरिबांना घरे देण्यासाठी प्रयत्न करणार : सुजय विखे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2019 11:43 AM2019-07-07T11:43:34+5:302019-07-07T11:44:29+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्थसंकल्पात भरीव तरतूद करून प्रत्येकांसाठी घरकूल योजना राबविण्याचा संकल्प केला आहे़
अहमदनगर: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्थसंकल्पात भरीव तरतूद करून प्रत्येकांसाठी घरकूल योजना राबविण्याचा संकल्प केला आहे़ नगर शहर व जिल्ह्यातही गरिबांना घरे मिळण्यासाठी सर्वोतपरी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन खासदार डॉ़ सुजय विखे यांनी दिले़
महानगरपालिकेमार्फत केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री आवास योजनेतंर्गत राबविण्यात येत असलेल्या घरकूल योजनेची शनिवारी येथील डॉ़ बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे विखे यांच्याहस्ते लकी ड्रॉ द्वारे सोडत झाली़ यावेळी ते बोलत होते़ कार्यक्रमाला आमदार संग्राम जगताप, महापौर बाबासाहेब वाकळे, महापालिकेचे आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग, उपमहापौर मालन ढोणे, स्थायी समितीचे सभापती मुदस्सर शेख, सभापती लता शेळके आदी उपस्थित होते़
विखे म्हणाले अहमदनगर महानगरपालिकेने ज्या ठिकाणी जागा असतील तेथील घरकूल योजनेचे प्रस्ताव शासनाकडे मंजुरीसाठी पाठवावेत़ या मंजुरीसाठी पाठपुरावा करू़ राज्याचे गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील असल्याने या कामांना तत्काळ मंजुरी मिळेल़ असे ते म्हणाले़ जगताप म्हणाले ज्यांना घरे नाहीत अशा सर्वांना आता घरे उपलब्ध होणार आहेत. झोपडपट्टी भागातील नागरिकांना वारूळाचा मारूती, काटवन खंडोबा येथे घरे मिळालेली आहेत. रामवाडी झोपडपट्टी हा भाग कॅन्टोन्मेंट परिसरात असल्यामुळे त्यांना मध्यंतरी अडचणी आल्या होत्या त्या सोडविण्यासाठी माझा प्रयत्न आहे. असे ते म्हणाले़
वाकळे म्हणाले केडगाव, वारूळाचा मारूती रोड या भागामध्ये ८४० घरे बांधण्यात येणार आहे. सावेडी ,केडगाव अशा भागामध्ये जागा पाहून त्या ठिकाणीही घरकूल योजना राबविण्यात येणार आहे. आणखी ५५० घरांचा प्रस्ताव शासनाकडे पाठविणार आहे. घरकुलांसाठी अर्जाची मागणी करण्यात आली होती़ त्यानुसार महापालिकेकडे ११ हजार ५२४ अर्ज प्राप्त झाले आहेत़ ज्यांनी अर्ज केला आहे़ अशा प्रत्येकाला घर मिळणार असल्याचे वाकळे म्हणाले़
जगताप-विखे यांच्यात गुफ्तगू
लोकसभा निवडणूक एकमेकांच्या विरोधात लढविणारे संग्राम जगताप व डॉ. सुजय विखे शनिवारी एकाच व्यासपीठावर होते. घरकुल योजनेच्या सोडतप्रसंगी खासदार विखे यांचे भाषण सुरू असतानाच आमदार जगताप यांचे आगमन झाले. यावेळी आमदार जगताप यांचे स्वागत आहे, असे विखे म्हणाले. त्यानंतर विखे-जगताप एकमेकांच्या शेजारीच बसले.
८४० लाभार्थ्यांची सोडत
आजच्या लकी ड्रॉ मध्ये ८४० चिठ्ठ्या काढण्यात येतील त्यांना घर उपलब्ध होणार आहेत. ज्यांची नावे या लकी ड्रॉ मध्ये येतील त्यांनी महापालिकेत येऊन संबंधित अधिकारी यांच्याकडे आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करावी़ असे ते म्हणाले़