बनावट चेकच्या माध्यमातून लुटीचा प्रयत्न
By Admin | Published: August 13, 2015 10:56 PM2015-08-13T22:56:10+5:302015-08-13T23:09:17+5:30
शिर्डी : बनावट चेक तयार करून त्या माध्यमातून लाख रुपयांची लूट करण्याचा प्रयत्न बॅक आॅफ इंडियाच्या शिर्डी शाखेत व्यवस्थापकाच्या सतर्कतेमुळे उघड झाला़
शिर्डी : बनावट चेक तयार करून त्या माध्यमातून लाख रुपयांची लूट करण्याचा प्रयत्न बॅक आॅफ इंडियाच्या शिर्डी शाखेत व्यवस्थापकाच्या सतर्कतेमुळे उघड झाला़ मात्र, पैसे गेले नसल्याचे सांगत पोलिसांकडून बँकेची फिर्याद नोंदवून घेण्यास टाळाटाळ होत आहे़ त्यामुळे फिर्याद नोंदविण्यासाठी तीन दिवसांपासून बँकेचे अधिकारी पोलीस ठाण्याच्या पायऱ्या झिजवत आहेत़
याबाबत व्यवस्थापक प्रभाकर मोगल यांनी दिलेली माहिती अशी की, ५ आॅगस्ट रोजी शिर्डीतील स्टेट बँक आॅफ हैद्राबाद या शाखेकडून क्लिअरन्ससाठी आमच्याकडे ६ लाख ९३ हजार १८२ रूपयांचा एक चेक आला़ हा चेक मुंबईतील दादरच्या प्रिन्स पाईप्स या कंपनीने मुंबईच्या राजेश स्टील यांना दिलेला होता़ चेकवर हुबेहूब स्वाक्षरी होती़ नेहमीप्रमाणे आम्ही पन्नास हजारांच्या पुढे चेक असल्याने दोन अधिकाऱ्यांनी तपासला़
आम्हाला संशय आल्यामुळे आम्ही प्रिन्स पाईप्सचे खाते उघडून त्यात नंबर शोधून त्यांना फोन केला़ तेथे नयन बअुवा यांनी फोन घेतला़ त्यांनी त्या क्रमांकाचा कोरा चेक आपल्या दप्तरी असल्याचे सांगत तो स्कॅन करून बँकेला पाठवला़ यामुळे बनावट चेक तयार करून पैसे काढण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचा मोगल यांचा संशय खरा ठरला़
चेक देणारा व घेणारा दोघेही मुंबईचे असतांना शिर्डीत चेक क्लिअरन्ससाठी जमा करण्यात आला हे विशेष! याबाबत अधिक तपास करून सत्य व गुन्हेगार उजेडात येण्याची गरज आहे़
(तालुका प्रतिनिधी)