मुळा डाव्या कालव्यात ऊसाचा ट्रक पलटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2018 05:53 PM2018-11-21T17:53:30+5:302018-11-21T17:53:34+5:30
परवाणगी नसतांनाही मुळा डाव्या कालव्यावरून ऊस वाहतूक करणारा संगमनेर साखर कारखान्याचा ट्रक कालव्यात कोसळला़
राहुरी : परवाणगी नसतांनाही मुळा डाव्या कालव्यावरून ऊस वाहतूक करणारा संगमनेर साखर कारखान्याचा ट्रक कालव्यात कोसळला़ त्यामुळे कालवा बंद करण्याची वेळ पाटबंधारे खात्यावर आली़ नगरसेवक शहाजी जाधव यांच्या मालकीचा ऊस आहे़ ट्रक जाधव यांच्या पुतण्याची असून विद्युत तारीवरती करून जीवघेणी कसरत करीत ऊस वहातुक सुरू होती़ कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा पाटबंधारे खात्याने दिला आहे़
बुधवारी येवले आखाडा येथील शहाजी जाधव यांच्या क्षेत्रातील ऊस मुळा डाव्या कालव्याच्या रस्त्यावरून जात होता़ कालव्याला पाणी सुरू होते़ पाण्यामुळे कालवा खचला असतांना ट्रकचे पुढील चाक खचले़ त्यामुळे अचानक ट्रक पलटी झाला़ ट्रक पलटी झाल्यानंतर पाटबंधारे खात्याची त्रेधा त्रिरपट उडाली़ ३०० क्युसेकसने पाण्याचे अवर्तन सुरू होते़ टप्प्याटप्याने पाणी अवर्तन कमी करण्यात आले़ त्यामुळे कालवा फुटण्याचा धोका टळला़
पाटबंधारे खात्याचे आधिकारी व कर्मचा-यांनी वरिष्ठांशी तातडीने संपर्क केला़ सहाय्यक कार्यकारी अभियंता योगेश देशमुख यांच्याकडे तक्रार आल्यानंतर कार्यकारी अभियंता किरण देशमुख यांच्याशी संपर्क साधण्यात आला़ त्यानंतर देशमुख यांनी कालवा टप्प्याटप्प्याने कमी करण्याचे आदेश दिले़ त्यानंतर कालव्याचे अवर्तन शुन्य करण्याच्या हालचाली झाल्या़ कालव्याच्या वरील बाजुला पाणी वळविण्याचे नियोजन सायंकाळपर्यंत सुरू होते़ मुळा चारीव्दारे पाणी देवळालीकडे वळविण्यात आले आहे़
घटनेनंतर क्रेनच्या चालकाने मुळा डाव्या कालव्यात पडलेल्या ऊसाच्या ट्रकची पहाणी केली़ कालव्याला पाणी शु्न्य झाल्यानंतर ट्रक कॅनच्या माध्यामतून रात्री बाहेर काढण्यात येणार आहे़ ऊस ट्रकचा चालक गुलाब पवार हा सुदैवाने बालंबाल बचावला आहे़ ट्रकचा मालक श्रीकांत जाधव हे कालवा क्रॉस करून जाणा-या तारा वरती करीत असल्याचे पाटबंधारे खात्याने लोकतशी बोलतांना सांगितले़ घटनास्थळी पाटबंधारे खात्याचे आधिकारी तळ ठोकून आहे़ मुळा डाव्या कालव्यात ऊसाचा ट्रक पलटी होण्याची ही पहीलीच घटना आहे़
कालव्याचे अवर्तन कमी करण्यात आले असून वरील बाजुने पाणी देवळालीकडे वळविण्यात आले आहे़ आज रात्री ऊसाचा ट्रक कालव्याच्या बाहेर काढण्यात येणार आहे़ संबंधीतांविरूध्द कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे़ -विकास गायकवाड, उपअभियंता