नगर तालुक्यातील १७ स्वस्त धान्य दुकानांचे परवाने अडचणीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2018 12:30 PM2018-07-21T12:30:22+5:302018-07-21T12:31:03+5:30
स्वस्त धान्य दुकानातील जे लाभार्थी धान्य घेण्यास पात्र आहेत त्यांना १०० टक्के पॉस मशिनद्वारे धान्य वाटप करण्यात येत आहे.
केडगाव : स्वस्त धान्य दुकानातील जे लाभार्थी धान्य घेण्यास पात्र आहेत त्यांना १०० टक्के पॉस मशिनद्वारे धान्य वाटप करण्यात येत आहे. मात्र नगर तालुक्यातील १७ स्वस्त धान्य दुकानदार पॉस मशिनचा वापर करीत नसल्याचे आढळल्याने त्या १७ दुकानदारांचे परवाने निलंबित करण्याचा अहवाल नगरचे तहसीलदार अप्पासाहेब शिंदे यांनी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना पाठविला आहे. त्यामुळे दुकानदारांचे परवाने आता अडचणीत आले आहेत.
सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अन्नधान्याचा लाभ मिळण्यासाठी पात्र लाभार्थ्यांना पॉस मशिनद्वारे १०० टक्के धान्याचे वाटप करण्याचे सरकारचे आदेश आहेत. याबाबत जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाने याबाबत स्वस्त धान्य दुकानदारांना याबाबत बैठकीत हे आदेश दिले आहेत. त्यानुसार मार्च २०१८ पासून पॉस मशिन आॅनलाइन सुरू झाल्यानंतर जे लाभार्थी धान्य घेण्यास पात्र आहेत, त्यांना १०० टक्के पॉस मशिनवर धान्य वितरण करावे,ज्या गावांना रेंज नाही, अशा १४ गावांना जिल्हाधिकाºयांनी पारंपरिक पद्धतीने धान्य वाटण्यास परवानगी दिली आहे. जर एखाद्या ठिकाणी धान्य उशिरा पोहचले असेल किंवा पॉस मशिन खराब झाली असेल, अथवा रेंज नसल्यामुळे धान्याचे वाटप करता आले नाही, अशा दुकानाबाबत तहसीलदारांची परवानगी घेऊन पारंपरिक पद्धतीने वाटप करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
गेल्या महिन्यात जिल्हा पुरवठा अधिका-यांनी नगर तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदारांची बैठक घेतली. यात ज्या स्वस्त धान्य दुकानदारांनी पॉस मशिनवर ५० टक्केपेक्षा कमी धान्य वाटप केले आहे,
तसेच ज्यांना रेंज असूनही त्यांनी मशिनद्वारे ५० टक्केपेक्षा कमी धान्य वाटप केले, अशा १७ दुकानदारांची तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले. त्यानुसार नगर तहसील कार्यालयातील ४ नायब तहसीलदार, पर्यवेक्षक,अव्वल कारकून, मंडळाधिकारी व तलाठी यांच्यामार्फत तपासणी करण्यात आली. यात दुकानांचे परवाने निलंबित करण्याचा अहवाल तहसीलदारांनी जिल्हा पुरवठा अधिका-यांना सादर केल्याने या दुकानदारांचे परवाने अडचणीत सापडले आहेत.