बारावी पास युवकाने उभारले शेतीपूरक गोटफार्म
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 04:38 AM2021-02-21T04:38:10+5:302021-02-21T04:38:10+5:30
बोधेगाव : निसर्गाचा लहरीपणा व पिकांची वन्यप्राण्यांकडून होणारी नासधूस यामुळे हतबल झालेल्या शेतकऱ्यांना गरिबांची गाय समजले जाणारे शेळीपालन तारणहार ...
बोधेगाव : निसर्गाचा लहरीपणा व पिकांची वन्यप्राण्यांकडून होणारी नासधूस यामुळे हतबल झालेल्या शेतकऱ्यांना गरिबांची गाय समजले जाणारे शेळीपालन तारणहार ठरत आहे. गोळेगाव (ता. शेवगाव) येथील एक बारावी शिकलेला युवा शेतकरी १२ गुंठे जागेत बंदिस्त शेळीपालन व्यवसाय उभारून वर्षाकाठी लाखोंचे उत्पन्न मिळवत आहे.
गोळेगाव येथील सुदर्शन द्वारकानाथ आंधळे (वय ३०) यांना १२ एकर जमीन आहे. शेती बागायती असूनही उत्पन्नाची शाश्वती नसल्याने त्यांनी शेळीपालन करण्याचा निर्णय घेतला. जानेवारी २०२० मध्ये त्यांनी राजस्थानहून ८ सोजत जातींच्या शेळ्या आणून व्यवसायाला सुरुवात केली. या शेळ्यांची घराजवळील छोट्याशा शेडमध्येच निगराणी केली. त्या शेळ्यांना प्रत्येकी एक-दोन पिल्ले झाली. त्यांच्या विक्रीतून त्यांनी पंजाबमधील बीटल जातीच्या आणखी १५ शेळ्या व १ बोकड आणले. सहा महिन्यांत ८ पाठी (मादी) व २ बोकडांच्या विक्रीतून त्यांना दोन-सव्वा दोन लाखांचे उत्पन्न झाले. सध्या त्यांच्याकडे ५ सोजत, १५ बीटल, १ सिरोही, २ तोतापरी, काही गावरान जातीच्या मिळून ३० शेळ्या, ८ बोकडे व १० बकऱ्या आहेत. या प्रकल्पासाठी त्यांनी १०० ते १२५ शेळ्यांचे संगोपन करता येईल, असे बंदिस्त गोटफार्म उभारले आहे. यामध्ये शेळ्यांचा प्रकार व अवस्थेनुसार स्वतंत्र विभागणी करून चारा-पाण्याच्या व्यवस्थेसह कंपार्टमेंट बनविले आहेत.
शेळ्यांना दिवसभरात मका, सरकी पेंड, तुरीचे भूस, पवना गवत, घास व कडुलिंबाचा पाला आदींचा खुराक दिला जातो. याकामी त्यांना वडील द्वारकानाथ आंधळे, आई सिंधूबाई, पत्नी भाग्यश्री यांची मदत होते. पोलीस दलातील विकास आंधळे या लहान बंधूचे मार्गदर्शन लाभले आहे.
फोटो ओळी २० गोटफार्म
गोळेगाव येथे सुदर्शन आंधळे यांनी उभारलेला बंदिस्त शेळीपालन प्रकल्प.