नगरकरांनी रिचवली साडेबारा लाख लिटर दारु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2020 01:57 PM2020-05-23T13:57:53+5:302020-05-23T13:58:58+5:30
जिल्ह्यात दारू विक्रीला परवानगी मिळाल्यानंतर नगरकरांनी मागील पंधरा दिवसात तब्बल साडेबारा लाख लिटर दारूची खरेदी केली आहे. या दारु विक्रीतून शासनाला कोट्यवधी रुपयांचा महसूल मिळाला आहे.
अरुण वाघमोडे ।
अहमदनगर : जिल्ह्यात दारू विक्रीला परवानगी मिळाल्यानंतर नगरकरांनी मागील पंधरा दिवसात तब्बल साडेबारा लाख लिटर दारूची खरेदी केली आहे. या दारु विक्रीतून शासनाला कोट्यवधी रुपयांचा महसूल मिळाला आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी प्रशासनाने जिल्ह्यात दारू विक्रीला बंदी घातली होती. ५ मे रोजी ही बंदी उठवून सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत दारू विक्रीला परवानगी देण्यात आली. दारु विक्रीला परवानगी मिळाल्यानंतर मद्यप्रेमींनी पहिल्याच दिवशी तब्बल ९९ हजार ३२८ बल्क लिटर दारूची खरेदी केली. अवघ्या सात तासांत साडेचार कोटी रुपयांची दारू विक्री झाली होती. पुढील पंधरा दिवसातही दारूला मोठी मागणी वाढून तब्बल साडेबारा लाख लिटर दारूची विक्री झाली. दारू खरेदी करताना फिजिकल डिस्टन्सिंगचे उल्लंघन होऊ नये, यासाठी प्रशासनाने दारूच्या होम डिलिव्हरीला परवानगी दिली आहे. नगर शहर व जिल्ह्यात या योजनेला विशेष काही प्रतिसाद मिळालेला नाही. मद्यप्रेमी दुकानात येऊनच दारू खरेदी करणे पसंत करत आहेत.
परमिट रूममधूनही मिळणार दारू
५ मेपासून प्रशासनाने देशी दारू दुकान व वाईन शॉपमधून दारू विक्रीला परवानगी दिली होती. परमिट रूम चालकांकडे मात्र मोठ्या प्रमाणात दारूसाठा शिल्लक असून या दारूची काही दिवसात मुदत संपणार आहे. त्यामुळे प्रशासनाने काही अटी व शर्तीनुसार परमिट रूम चालकांनाही एमआरपीप्रमाणे सीलबंद दारु विक्रीला परवानगी दिली आहे.
कंटेनमेंट झोन (प्रतिबंधित क्षेत्र) व त्या लगतचे पाचशे मीटर क्षेत्र वगळून इतर परमिट रूममधून दारू विक्री करता येणार आहे. यामध्ये १९ मार्चपर्यंत शिल्लक राहिलेला साठा सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत विक्री करता येणार आहे. हा मद्यसाठा संपल्यानंतर परमिटरूम चालकांना लॉकडाऊन कालावधीत नवीन मद्यसाठा खरेदी करता येणार नाही, अशा स्वरूपाचा आदेश देण्यात आलेला आहे.
गावठी दारूचे अड्डे सुरूच
जिल्ह्यात दारू विक्रीला परवानगी मिळाली असली तरी ग्रामीण भागात विविध ठिकाणी गावठी दारू तयार करून त्याची विक्री केली जात आहे. मागील दोन महिन्यात पोलीस प्रशासनाने दीडशेपेक्षा जास्त गावठी दारू अड्डे उद्ध्वस्त करून गुन्हे दाखल केले आहेत. तरीही गावठी दारू मात्र काही कमी झालेली नाही.