बारा तासांत ओरबाडले नऊ महिलांचे सव्वापाच लाखांचे दागिने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:22 AM2021-02-11T04:22:03+5:302021-02-11T04:22:03+5:30
सोमवारी सकाळी साडेअकरा वाजता चोरट्यांनी पहिली चोरी शहरातील बालिकाश्रम रोडवरील चिंतामणी हॉस्पिटलजवळ केली. त्यानंतर सायंकाळी सावेडी उपनगरात पाइपलाइन रोड, ...
सोमवारी सकाळी साडेअकरा वाजता चोरट्यांनी पहिली चोरी शहरातील बालिकाश्रम रोडवरील चिंतामणी हॉस्पिटलजवळ केली. त्यानंतर सायंकाळी सावेडी उपनगरात पाइपलाइन रोड, गुलमोहर रोड, एकवीरा चौक ते प्रोफेसर कॉलनी येथे महिलांचे दागिने ओरबाडले. याच दिवशी कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीतील मार्केट यार्ड, आनंदधाम रोड, नंदनवल लॉन व बुरूडगाव रोडवर महिलांचे दागिने ओरबाडले. या घटनांनंतर पोलिसांना काही ठिकाणी मिळालेले सीसीटीव्ही फुटेज व फिर्यादी महिलांनी वर्णन केल्यानुसार हे एकाच टोळीचे कृत्य असल्याचा संशय आहे. चोरटे पसार झाल्यानंतर पोलिसांची वाहने त्यांचा शोध घेत होती. एकाच दिवशी घडलेल्या या घटनांमुळे महिलांमध्ये घबराट पसरली आहे.
---------------
चोरटे दागिने लुटताहेत...पोलीस फलक लावताहेत
वाढत्या सोनसाखळी चोरीच्या पार्श्वभूमीवर तोफखाना पोलिसांनी सावेडी परिसरात प्रबोधनात्मक फलक लावले आहेत. घराबाहेर पडताना व गर्दीच्या ठिकाणी गेल्यानंतर महिलांनी काळजी घ्यावी, अनोळखी व्यक्तीशी संवाद साधू नये, गळ्यातील दागिने स्कार्प व ओढणीने झाकून घ्यावेत, आदी सूचना या फलकांवर देण्यात आल्या आहेत. महिला मात्र किती दिवस अशी काळजी घेणार. यासाठी आता पोलिसांनीच सराईत चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
----------------
गुन्हे प्रकटीकरण शाखा काय करते ?
तोफखाना आणि कोतवाली हद्दीत चेन स्नॅचिंग, इतर चोऱ्या व घरफोड्यांचे मोठे प्रमाण वाढले आहे. सर्वाधिक जास्त घटना या सावेडी उपनगरात होत आहेत. सराईत चोरटे चोरी करून निघून जातात. पोलीस स्टेशनची गुन्हे प्रगटीकरण शाखा काय काम करते. या शाखेतील कर्मचारी दुसऱ्याच कामात व्यस्त असतात. त्यामुळे चोरट्यांचा बंदोबस्त कसा होणार असाही प्रश्न आहे.
---------------------
महिलांचे दागिने चोरीच्या घटना घडल्यानंतर पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग वाढविण्यात आली आहे, तसेच नाकाबंदी करून संशयित वाहनांची तपासणी केली जात आहे. दागिने ओरबाडणाऱ्या चोरट्यांचा सर्वत्र शोध घेतला जात आहे.
-सुनील गायकवाड, निरीक्षक तोफखाना पोलीस स्टेशन
फोटो १० चोरटे