Coronavirus : पाथर्डी तालुक्यातील एका युवकासह बारा जण ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2020 03:25 PM2020-04-10T15:25:53+5:302020-04-10T15:27:52+5:30
पाथर्डी तालुक्यातील एका गावात परतलेल्या एका युवकासह त्याच्या संपर्कातील बारा जणांना आज प्रशासनाने जिल्हा रूग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी पाठविले आहे
माणिकदौंडी : दिल्लीतील मरकजच्या कार्यक्रमातून पाथर्डी तालुक्यातील एका गावात परतलेल्या एका युवकासह त्याच्या संपर्कातील बारा जणांना आज प्रशासनाने जिल्हा रूग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी पाठविले आहे, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी भगवान दराडे यांनी दिली.
खोकल्याचा त्रास होत असल्याने तालुक्यातील एका प्राथमिक आरोग्य केंद्रात एक ज्येष्ठ नागरिक तपासणीसाठी आला होता. तेथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्याने उपचार करताना त्या ज्येष्ठ नागरिकाकडे अधिक माहिती घेतली. त्यावेळी त्या ज्येष्ठ नागरिकांच्या कुटुंबातील एकजण मुंबई येथून आल्याचे समजले. त्यांनी ही बाबत तालुका प्रशासनाच्या लक्षात आणून दिली. शुक्रवारी सकाळी पोलीस निरीक्षक रमेश रत्नपारखी, डॉ. भगवान दराडे, नायब तहसीलदार पंकज नेवसे यांनी त्या गावात जाऊन चौकशी केली. तेथील एक युवक मुंबई येथे व्यवसायानिमित्त राहतो. तो मुंबईवरून दिल्लीतील मरकजच्या धार्मिक कार्यक्रमाला गेला होता. तेथून तो १३ मार्चला मुंबईत परतला होता. मुंबईतून २६ मार्चला तो पाथर्डी तालुक्यातील त्याच्या गावी परतला होता. त्याचे कुटुंब गावाच्या बाहेर डोंगराच्या कडेला राहते. त्याचे वडील, भावाला खोकल्याचा त्रास होत असल्याचे निदर्शनास आले. त्या युवकासह त्याच्या संपर्कातील बारा जणांना ताब्यात घेऊन प्रशासनाने कोरोनाबाबतच्या तपसाणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठविले.