जिल्ह्यातील बाराशे खेळाडूंना मिळणार सवलतीचे गुण
By नवनाथ कराडे | Published: May 18, 2019 02:20 PM2019-05-18T14:20:21+5:302019-05-18T14:20:25+5:30
विद्यार्थ्यांमध्ये खेळाची आवड निर्माण व्हावी यासाठी राज्य शासनाने दहावी आणि बारावीच्या परीक्षेत खेळाडूंना सवलतीच्या गुणाची सवलत दिली आहे.
नवनाथ खराडे
अहमदनगर : विद्यार्थ्यांमध्ये खेळाची आवड निर्माण व्हावी यासाठी राज्य शासनाने दहावी आणि बारावीच्या परीक्षेत खेळाडूंना सवलतीच्या गुणाची सवलत दिली आहे. पूर्वी फक्त राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंनाच हा लाभ मिळत होता. मात्र २०१८-१९ या शैक्षणिक वर्षापासून जिल्हा स्तरापासून आणि एन.सी.सी, स्काउट गाईडच्या विद्यार्थ्यांनाही हा लाभ मिळणार असल्याने यंदा जिल्ह्यातील तब्बल तेराशे खेळाडूंना सवलतीचा लाभ मिळणार आहे.
खेळाची भावना वाढीस लागावी या हेतूने राज्य सरकारने २६ खेळांमध्ये विद्यार्थ्यांनी नैपुण्य दाखविल्यास दहावी व बारावीच्या परीक्षेत सवलतीचे गुण देण्याची तरतूद करण्यात आली आहे. गेल्या वर्षीपर्यंत फक्त राज्यस्तरीय, राष्ट्रीयस्तरीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सहभागी विद्यार्थी खेळाडूंना सवलतीचे गुण देण्यात येत होते.
गुणासंदर्भात जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या माध्यमातून हा प्रस्ताव माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्याकडे पाठवावा लागतो.
२०१८-१९ या शैक्षणिक वर्षापासून सवलतीचे गुण देण्यासाठी सरकारने व्याप्ती वाढवली आहे. जिल्हास्तर, विभाग स्तरावरील खेळाडूंनाही आता हे वाढीव गुण मिळणार आहे.
याशिवाय एन.सी.सी, स्काउट गाईडच्या विद्यार्थ्यांना सवलतीचे गुण मिळणार आहेत. त्यामुळे गेल्या वर्षीपेक्षा यंदा प्रस्तावाची संख्या वाढली आहे.
गेल्या वर्षी राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील दहावीच्या ९२ तर बारावीच्या ७२ विद्यार्थ्यांना वाढीव गुण मिळाले होते.
यंदा दहावीसाठी तब्बल ७७१ खेळाडूंचे तर बारावीसाठी ४६१ खेळाडूंचे प्रस्ताव जिल्हा क्रीडा कार्यालयाने माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्याकडे पाठविले आहेत. त्यामुळे यंदा तब्बल १ हजार २३२ विद्यार्थी खेळाडूंना वाढीव गुणांचा लाभ मिळणार आहे.
असे मिळणार गुण
जिल्हास्तर प्राविण्य - ०३
विभागस्तर प्राविण्य - ०५
राज्यस्तर प्राविण्य - ०७
राष्ट्रीय स्तर- १० (प्राविण्य), 0७ (सहभाग)
आंतरराष्ट्रीय : २५ प्राविण्य, २०- सहभाग
संघटनातील वादामुळे काही खेळाडूंचे नुकसान
४२६ खेळ प्रकारात खेळाडूंना वाढीव गुण मिळणार आहेत. मात्र, व्हॉलीबॉल, स्विमिंग आणि सायकलिंग या खेळप्रकारातील खेळाडूंना हा लाभ मिळणार नाही. या खेळांच्या समांतर संघटना सुरु असल्यामुळे संघटनांमध्ये वाद सुरु आहे. त्यामुळे संघटनांच्या वादामध्ये खेळाडूंचे नुकसान होणार आहे.
एन.सी.सी, स्काउट व गाईड
एनसीसीमध्ये प्रजासत्ताक दिन संचलन, राष्ट्रीय स्तर शिबिर तसेच संलग्न स्पर्धेमध्ये सहभाग असल्यास सवलतीचे १० गुण मिळणार आहेत. यामध्ये पदक प्राप्त केल्यास १५ गुण, आंतरराष्ट्रीय युथ एक्सचेंज प्रोग्राममध्ये सहभाग असल्यास २० गुण मिळतील.
स्काउट व गाईड या प्रकारात राष्ट्रपती पदक किंवा आंतरराष्ट्रीय जांबोरी शिबिरात सहभाग असल्यास १० गुण मिळणार आहेत.
२०१८-१९ या शैक्षणिक वर्षापासून जिल्हास्तरापासून वाढीव गुण मिळणार असल्याने प्रस्तावांच्या संख्येत वाढ झाली आहे. सहावीपासून दहावीपर्यंत/ बारावीपर्यंत कधीही खेळल्यानंतर सवलतीचे गुण मिळणार आहेत. शिक्षण विभागाकडे प्रस्ताव पाठविण्याचे काम सुरु आहे. - कविता नावंदे, जिल्हा क्रीडा अधिकारी