तब्बल २० जणांना पिसाळलेल्या कुत्र्यानं घेतला चावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2019 07:43 PM2019-05-15T19:43:22+5:302019-05-15T19:43:48+5:30
श्रीगोंदा तालुक्यातील टाकळीकडेवळीत येथे तब्बल वीस जणांचा पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतला. गेल्या दोन दिवसांपासून कुत्र्याने उच्छाद मांडला आहे
आढळगाव : श्रीगोंदा तालुक्यातील टाकळीकडेवळीत येथे तब्बल वीस जणांचा पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतला. गेल्या दोन दिवसांपासून कुत्र्याने उच्छाद मांडला आहे. ग्रामदैवताच्या यात्रोत्सवावर कुत्र्याच्या उपद्रवामुळे विरजण पडले आहे. चावा घेतलेल्यांपैकी तिघांना पुणे येथे ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
टाकळीकडेवळीत येथील ग्रामदैवत भैरवनाथाचा यात्रोत्सव सुरु असताना रविवारी मध्यरात्री पासून एक पिसाळलेल्या कुत्र्याने अनेक जनांचा चावा घेत दहशद निर्माण केली आहे. तब्बल वीस जनांचा चावा घेतला असून त्यामध्ये लहान मुलांसह गावातील राजकीय प्रतिष्ठित प्रौढांचाही समावेश आहे. अनेकांना चावा घेतल्यामुळे पिसाळलेले असण्यावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर ग्रामस्थ चांगलेच धास्तावले आहेत, लहान मुलांसह प्रौढांनीही घराबाहेर पडताना काळजी वाटत आहे. चावा घेतल्यानंतर आढळगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात धनुर्वात आणि रेबिस प्रतिबंधक लस घेतल्यानंतर रुग्णांना नगर येथील जिल्हा रुग्णालयात रेबिस प्रतिबंधक सिरम घेण्यासाठी पाठविण्यात आले आहे. एकाच रुग्णवाहिकेतून बारा जणांना आज पाठविण्यात आले आहे. एवढ्या मोठ्या संख्येत पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याची तालुक्यातील पहिलीच घटना असून परिसरातील नागरिकांमध्ये पिसाळलेल्या कुत्र्याची दहशत निर्माण झाली आहे.
चावा घेतलेले कुत्रे पिसाळलेले असल्यामुळे रेबिज प्रतिबंधक सिरम घेणे आवश्यक आहे. रुग्णांसाठी सरकारी रुग्णालयात लस आणि सिरम उपलब्ध आहे. - डॉ. नितिन खामकर, तालुका आरोग्य अधिकारी, पंचायत समिती श्रीगोंदा.