कोपरगावात दहा लाखांच्या खंडणीसाठी दोघांचे अपहरण..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2020 12:02 PM2020-07-19T12:02:41+5:302020-07-19T12:03:22+5:30
कोपरगाव शहरातील दुकान मालक व कामगाराचे अपहरण करुन त्यांना दहा लाख रुपयांची खंडणी मागितल्याची घटना शनिवारी (१८ जुलै) रात्री उघडकीस आली.
कोपरगाव : शहरातील दुकान मालक व कामगाराचे अपहरण करुन त्यांना दहा लाख रुपयांची खंडणी मागितल्याची घटना शनिवारी (१८ जुलै) रात्री उघडकीस आली.
श्रीकृष्ण बबनराव पवार ( रा. समतानगर, कोपरगाव ), अक्रम शफिओद्दीन शेख (रा. दत्तनगर, कोपरगाव ) अशी अपहरणातील सुटका झालेल्यांची नावे आहेत. दरम्यान, पोलिसांनी सापळा रचून शिर्डी येथे चार जणांना अटक करुन मालक व कामगारांची सुटका केली आहे.
पोलीस सूत्रांची माहिती अशी की, गांधी पुतळा परिसरातील बालगणेश किडस् वेअर्सचे मालक व या दुकानात कामाला असलेल्या एका कामगाराचे शुक्रवारी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास स्वीफ्ट कारमधून अपहरण करण्यात आले. त्यांतर शिर्डी येथे एका हॉटेलमध्ये त्यांना दोन दिवस डांबून ठेवत मारहाण केली. त्यांच्याकडे दहा लाखांची खंडणी मागितल्याचे शनिवारी रात्री उघड झाले. त्यानंतर आरोपींना पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर , सहायक पोलीस निरीक्षक दिपक बोरसे यांच्या पथकाने अटक केली आहे.
याप्रकरणी बबनराव बाळाजी पवार ( वय ७०, रा.समतानगर कोपरगाव ) यांच्या फिर्यादीवरून सचिन राजेंद्र कुसुंदर (रा.लक्ष्मीनगर, कोपरगाव ), सचिन संजय साळवे ( रा.गजानननगर, कोपरगाव ), आकाश विजय डाके (रा.गोकुळनगरी, कोपरगाव ), शुभम केशव राखपसारे (रा.कोर्टरोड, कोपरगाव ) यांच्याविरुद्ध रविवारी ( दि.१९ ) पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास ठाणे अंमलदार सहायक फौजदार शैलेंद्र ससाणे यांनी गुन्हा दाखल केला आहे.