केळुंगण शिवारात अडीच लाखांची देशी दारू जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2018 07:20 PM2018-03-01T19:20:52+5:302018-03-01T19:21:38+5:30
मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास येथील पोलिसांनी सापळा रचून बुधवारी सुमारे साडे सदोतीस हजार रूपये किंमतीच्या देशी दारूसह एकूण २ लाख ३७ हजार ४४० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.
राजूर : कोल्हार घोटी रस्त्यावर केळुंगण गावाच्या शिवारात मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास येथील पोलिसांनी सापळा रचून बुधवारी सुमारे साडे सदोतीस हजार रूपये किंमतीच्या देशी दारूसह एकूण २ लाख ३७ हजार ४४० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.
रात्री घोटी मार्गे राजूरकडे मारूती गाडीतून देशी दारूची वाहतूक होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच सहायक पोलीस निरीक्षक पी. वाय. कादरी यांनी फौजदार अशोक उजागिरे, ठाणे अंमलदार नवले, पोलीस नाईक रवींद्र वाकचौरे, पोलीस काँस्टेबल प्रवीण थोरात, नितीन सोनवणे यांच्या समवेत सापळा रचला. त्यानुसार रात्री साडे आठच्या सुमारास घोटी मार्गे येणारी मारूती -८८ या कारमधून (क्रमांक एम. एच.१२ सी वाय ४७२८) देशी दारूची बेकायदा वाहतूक होत असल्याचा संशय पोलिसांना आला. त्यानुसार या कारचा कोल्हार घोटी रस्त्यावर पाठलाग करीत ती केळुंगणच्या शिवारात अडविण्यात आली.
कार चालकासह अटक
या कारची झडती घेतली असता त्यामध्ये पोलिसांना देशी दारूचे प्रत्येकी १८० मिलीच्या ४८ बाटल्या असलेले १५ खोके आढळले. या कारवाईत पोलिसांनी ३७ हजार ४४० रुपयांची दारू जप्त करण्यात आली. याबरोबरच मालवाहतूक करणारी सुमारे दोन लाख रूपयांची मारूती कार देखील पोलिसांनी जप्त केली. कार चालकासह एकाला पोलिसांनी अटक केली.