शेतकऱ्यांची फसवणूक करणारे दोघे अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:20 AM2021-04-10T04:20:27+5:302021-04-10T04:20:27+5:30
शुक्रवारी दुपारी जालना येथून व्यापारी रमेश मुथ्था व त्याचा मुलगा चंदन यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. गुरुवारपासून पोलीस तेथे तळ ...
शुक्रवारी दुपारी जालना येथून व्यापारी रमेश मुथ्था व त्याचा मुलगा चंदन यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. गुरुवारपासून पोलीस तेथे तळ ठोकून होते. दोघेही एका नातेवाईकाच्या घरी आश्रयाला होते. सायंकाळी उशिरा त्यांना श्रीरामपुरात आणण्यात आले.
या गुन्ह्यात गणेश मुथ्था, आशा मुथ्था व चांदणी मुथ्था यांना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे. सर्व जण सध्या पोलीस कोठडीत आहेत. रमेश मुथ्था या गुन्ह्यातील मुख्य आरोपी होता. त्याने माळवाडगाव (ता.श्रीरामपूर) येथील खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांकडून सोयाबीन व इतर भुसार मालाची मोठ्या प्रमाणावर खरेदी केली होती. मुथ्था याचे येथे किराणा मालाचे दुकान होते.
दरम्यान, पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांनी आरोपींना मदत करणाऱ्या नातेवाईकांना या गुन्ह्यात सहआरोपी करणार असल्याची माहिती लोकमतला दिली. मुख्य आरोपी जेरबंद झाल्यानंतर प्रकरणाचा तपास थांबणार नाही. ज्यांनी आरोपींना आश्रय दिला त्यांची कोणतीही गय केली जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
आरोपींवर ९ फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून ते फरार होते. पोलिसांनी त्यांच्या शोधासाठी जालना, जळगाव, धुळे, नंदूरबार, पालघर, बडोदा, सुरत येथे पथके पाठविली होती. मात्र ते मिळून येत नव्हते.
पीडित शेतकऱ्यांनी आमदार लहू कानडे व जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील यांना या प्रकरणात लक्ष घालण्याची मागणी केली होती.
---------