८५० किलोमीटरच्या सद्भावना सायकल रॅलीतील अवलिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2019 12:58 PM2019-09-15T12:58:41+5:302019-09-15T13:01:38+5:30
नगर येथील स्नेहालय परिवाराच्या गागोदे (जि. रायगड) ते सेवाग्राम (वर्धा) या ८५० किलोमीटरच्या सद्भावना रॅलीत दोघा अवलियांनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. त्यातील एक जण पॅराआॅलिम्पिक सुवर्ण विजेता, तर दुसरा वृक्षक्रांतीसाठी झटणारा आहे.
बाळासाहेब काकडे /
श्रीगोंदा : नगर येथील स्नेहालय परिवाराच्या गागोदे (जि. रायगड) ते सेवाग्राम (वर्धा) या ८५० किमीच्या सद्भावना रॅलीत दोघा अवलियांनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. त्यातील एक जण पॅराआॅलिम्पिक सुवर्ण विजेता, तर दुसरा वृक्षक्रांतीसाठी झटणारा आहे.
आचार्य विनोबा भावे, महात्मा गांधी व लोकमान्य टिळक यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त समता, ऐक्य, बंधुभाव, राष्ट्रप्रेम याचा संदेश देण्यासाठी गिरीश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनासाठी गागोदे (रायगड) ते सेवाग्राम वर्धा ही ८५० किमीची सद्भावना सायकल यात्रा सुरू केली आहे. या यात्रेत देशाच्या विविध भागातून ज्येष्ठ नागरिक, युवक, युवती सहभागी झाले आहेत. यामध्ये गुजरातमधील ५३ वर्षीय दिव्यांग रमेशभाई ठाकूर व वृक्ष लागवड, संवर्धन याचा संदेश देणारे अंदमान-निकोबार बेटातील षण्मुखानंद नाथन सहभागी झाले आहेत. यातील षण्मुखानंद नाथन हे अंदमान निकोबार बेटावरील आहेत. ते दहावी पास आहेत. इंजिनिअरिंगचे शिक्षण घेताना अपयश आले. निसर्ग उपचार डिप्लोमा केला. त्यानंतर मोर्चा फिल्मसिटीकडे वळविला. त्यानंतर लग्न झाले. एक मुलगी झाली. २० भोजपूरी चित्रपटात असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम केले. ‘प्यार बिना चैन कहा रे’ हा चित्रपट शेवटचा. त्यानंतर परमेश्वराचा शोध घेण्यासाठी जंगल गाठले.
तेव्हा देव झाडातच असल्याचा साक्षात्कार झाला. तेव्हापासून ते वृक्षक्रांतीसाठी झटत आहेत. बारा वर्षांपासून घराचे तोंडही त्यांनी पाहिले नाही. अकोला जिल्ह्यातील अग्रवाल या प्राथमिक शाळेत राहून त्यांनी जिल्हाभर सहा लाख झाडे लावली. त्यांचे संवर्धन करत आहेत. २०१५ पासून ते हे काम करत आहेत. त्यांनी शासनाला ‘एक जन्म एक झाड’ व ‘एक विद्यार्थी एक झाड’ या दोन योजना दिल्या. शासनानेही त्यांच्या योजनांचा समावेश केला आहे.
गुजरातमधील बरूचा येथे रमेशभाई ठाकूर यांचा जन्म झाला. बारावीला असताना रेल्वे अपघात झाला. त्यात एक पाय गमावला. निराश न होता जयपूर फूटमध्ये डॉ. पी. के. शेट्टी, रामचंद्र शर्मा व बी. आर. मेहता यांच्या मार्गदर्शनाखाली दिव्यांगांसाठी कृत्रिम हातपाय बनविण्याचे प्रशिक्षण घेतले. सन २००२ व २००४ मध्ये पॅराआॅलिम्पिमध्ये १०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत सुवर्ण पदके जिंकली. भारतीय सैन्य दलाच्या वैद्यकीय विभागात युद्धात हातपाय गमाविलेल्या सैनिक बांधवांना कृत्रिम हातपाय बनवून देण्याची नोकरी मिळाली. सैन्य दलात असताना शांती सेनेचे १६ देशात नेतृत्व केले.
सेवानिवृत्तीनंतर दिव्यांगांना हातपाय उपलब्ध करून देण्यासाठी मुंबईत भगवान महावीर ट्रस्ट व रत्नानिधी ट्रस्टमध्ये काम केले. सन १९८८ ला बाबा आमटे यांच्या ‘भारत जोडे’ सायकल यात्रेत सहभागी होऊन राष्ट्रप्रेमाचा संदेश दिला. सध्या त्यांनी वयाची पन्नासी ओलांडली आहे. एक पाय नाही. आत्मविश्वासाच्या बळावर ते सद्भावना यात्रेत सहभागी झाले असून ते या सायकल यात्रेचे नेतृत्व करीत आहेत.