स्नेहालयातील दोन मुलांचा तलावात बुडून मृत्यू
By Admin | Published: May 23, 2014 01:13 AM2014-05-23T01:13:47+5:302014-05-23T01:27:07+5:30
अहमदनगर : एम.आय.डी.सी. भागातील स्नेहालयाच्या विशेष बालगृहातील दोन मुले निंबळक येथील तलावात पोहण्यासाठी गेले होते.
अहमदनगर : एम.आय.डी.सी. भागातील स्नेहालयाच्या विशेष बालगृहातील दोन मुले निंबळक येथील तलावात पोहण्यासाठी गेले होते. तलावात पाण्याचा अंदाज न आल्याने गुरुवारी दुपारी तीनच्या सुमारास त्यांचा बुडून मृत्यू झाला. या प्रकरणी एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्यात मुलांच्या अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. विकास किशोर ससाणे (वय १४, रा. लाल टाकीनगर ) आणि मयूर संताराम मापारी (वय १३, रा. निफाड, जि. नाशिक) अशी मयत मुलांची नावे आहेत. एम.आय.डी.सी. परिसरात स्नेहालयाचे विशेष बालगृह आहे. या बालगृहात काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या मुलांचे पालन-पोषण केले जाते. विकास आणि मयूर ही दोन मुले याच बालगृहात होती. गुरुवारी दुपारी विनापरवाना ती बाहेर पडली आणि थेट निंबळक परिसरात असलेल्या तलावामध्ये पोहण्यासाठी गेली. तलावात पाण्याचा अंदा ज न आल्याने ती बुडाली आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. दोन मुलांचे मृतदेह तरंगत असल्याचे ग्रामस्थांनी तलावात पाहिले. त्यानंतर त्या मुलांना तलावातून बाहेर काढून नगरमधील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र मुलांची तपासणी करून डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मुलांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत. दरम्यान एम.आय.डी. सी. पोलीस ठाण्यात मुलांच्या पालकांनी धाव घेतली आणि संस्थेचे अधीक्षक आणि काळजीवाहक हेच मुलांच्या मृत्युला जबाबदार असल्याचा टाहो फोडला. त्यांच्यावर गुन्हा दाखल केल्याशिवाय मुलांचे मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा त्यांनी घेतला. मुलांच्या पालकांनी एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्यात सायंकाळी संस्थेविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. त्यासाठी पालक व नातेवाईकांची ठाण्यात गर्दी झाली होती. ————- मुलांचा तलावात बुडून मृत्यू झाला, याबाबत अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतरच पुढील कारवाईबाबत निर्णय घेता येईल. मुलांच्या पालकांनी संस्थेचा निष्काळजीपणाच मुलांच्या मृत्युस कारणीभूत असल्याचा आरोप केला आहे. त्याबाबत चौकशी करूनच कारवाई करण्यात येईल. -किरणकुमार बकाले, सहा. पोलीस निरीक्षक बालगृहात सध्या उन्हाळी शिबिर सुरू आहे. दुपारच्यावेळी मुलांची जेवणाची सुट्टी झाली होती. मुलांची जेवणे झाल्यानंतर त्यांना थोडी मोकळीक दिली जाते. नेमक्या याच काळात दोन मुले शिबिरातून पळून गेली. शिबिर पुन्हा सुरू झाल्यानंतर दोन मुले नसल्याचे लक्षात आल्याक्षणीच संस्थेचे काळजीवाहक राजेंद्र वाकचौरे यांनी संस्थेच्या अन्य कर्मचार्यांमार्फत मुलांचा शोध घेतला. काही वाटसरुंनी मुले तलावाकडे गेल्याचे सांगितले. तिथे वाकचौरे यांनी चौकशी केली असता तलावात मुले बुडाल्याचे समजले. मुलांना वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले, मात्र त्यात अपयश आले. ग्रामस्थांच्या मदतीने मुलांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. झालेली घटना दुर्दैवी आहे. या घटनेमध्ये संस्थेचा कोणताही निष्काळजीपणा झालेला नाही. -वैजनाथ लोहार, अधीक्षक, बालगृह