साईबाबा पतसंस्थेत दोन कोटींचा अपहार; व्यवस्थापक, कॅशियरवर गुन्हा
By Admin | Published: May 18, 2017 03:45 PM2017-05-18T15:45:41+5:302017-05-18T15:45:41+5:30
लेखापरिक्षणात पतसंस्थेचे व्यवस्थापक व कॅशियर यांनी संगनमताने २ कोटी १६ लाख रूपयांपेक्षा अधिक रकमेचा अपहार केल्याचे उघडकीस आले.
आॅनलाईन लोकमत
बोटा (अहमदनगर), दि़ १८ - संगमनेर तालुक्यातील साकुर बिरेवाडी येथील साईबाबा ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या व्यवस्थापक व कॅशियर यांनी संगनमताने तब्बल २ कोटी १६ लाख रूपयांपेक्षा अधिक रकमेचा अपहार केल्याप्रकरणी घारगाव पोलीस ठाण्यात या दोन जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
मुदत संपलेल्या ठेवींची रक्कम मिळण्यासाठी साईबाबा सहकारी पतसंस्थेच्या सभासद ठेवीदार संस्थेकडे वेळोवेळी मागणी करीत होते़ मात्र, ठेवी मिळत नव्हत्या़ त्यामुळे त्यांनी एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात संगमनेर प्रांत कार्यालयासमोर ठेवी परत मिळाव्यात व संस्थेच्या कारभाराची चौकशी करावी, यासाठी बेमुदत उपोषण सुरू केले होते. उपनिबंधकांनी उपोषणकर्त्या सभासदांची भेट घेऊन या संदर्भात तातडीने चौकशी करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेतले. सहकारी पतसंस्था लेखापरिक्षक संतोष रंगनाथ पंधारे यांनी केलेल्या लेखापरिक्षणात पतसंस्थेचे व्यवस्थापक व कॅशियर यांनी संगनमताने २ कोटी १६ लाख रूपयांपेक्षा अधिक रकमेचा अपहार केल्याचे उघडकीस आले.
लेखापरिक्षक संतोष पंधारे यांनी घारगाव पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून या पतसंस्थेचे व्यवस्थापक रावसाहेब कारभारी टेकुडे (रा. टेकुडवाडी, देसवडे, ता़ पारनेर) व कॅशियर सीताराम मनोहर शेंडगे (रा मांडवे बुद्रुक, ता़ संगमनेर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार साकुर बिरेवाडी येथील साईबाबा सहकारी पतसंस्थेमध्ये १ एप्रिल २०१६ ते ३१ मार्च २०१७ पर्यंत व्यवस्थापक रावसाहेब टेकुडे व कॅशियर सीताराम शेंडगे यांनी संगनमताने संस्थेच्या पावत्यांवर व चेकवर खोट्या सह्या करून संस्थेच्या जमा झालेल्या रोख रकमा व ठेवी बँकेमध्ये भरणा न करता स्वत:कडे ठेवल्या़ तसेच संस्थेच्या खाते असलेल्या वेगवेगळ्या बँकांतून रोख रकमा तसेच मुदतपूर्व ठेवीच्या रकमा खोटे ठराव तयार करून संस्थेच्या डे बुकला नोंदी न करता काढून घेतल्या़ तसेच जिल्हा बँकेच्या साकुर शाखेच्या लॉकरमध्ये ठेवलेले संस्थेच्या सभासदांचे दागिनेही परस्पर काढले. यामध्ये या दोघांनी सुमारे २ कोटी १६ लाख रूपयांचा अपहार करून सभासद व ठेवीदार यांची फसवणूक केली. घारगावचे पोलीस निरीक्षक दिलीप निघोट पुढील तपास करीत आहे. गुन्हा दाखल झाल्यावर आरोपी फरार झाले आहेत.