एचआरसीटी रिपोर्टसाठी दोन दिवसांचे वेटिंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:21 AM2021-04-27T04:21:13+5:302021-04-27T04:21:13+5:30
रुग्णांना कोरोनाची काही लक्षणे असल्यास किंवा कोरोनामुळे रुग्णांच्या फुफ्फुसांमध्ये काही नुकसान झाले आहे का हे पाहण्यासाठी सिटीस्कॅन मशीनमधून ही ...
रुग्णांना कोरोनाची काही लक्षणे असल्यास किंवा कोरोनामुळे रुग्णांच्या फुफ्फुसांमध्ये काही नुकसान झाले आहे का हे पाहण्यासाठी सिटीस्कॅन मशीनमधून ही एचआरसीटी टेस्ट केली जाते. सध्या नगरसह जिल्ह्यात या चाचणीसाठी लोक अनावश्यक गर्दी करत आहेत. मुळात तज्ज्ञांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय या चाचण्यांचा धडाका सुरू आहे. अनेक लोक किंवा संशयित रुग्ण डॉक्टरांची कोणतीही चिठ्ठी न घेता सरळ एचआरसीटी चाचणीसाठी जातात आणि रेडिओलॉजीस्टसुद्धा कोणतीही खातरजमा न करता येईल त्याची चाचणी करतात. या चाचणीबाबत अनावश्यक भीती लोकांमध्ये पसरल्याने सिटीस्कॅन सेंटरवर मोठी गर्दी होत आहे. यातून गरजू रुग्णाला तासन्तास प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यातून त्याच्या जीविताला धोका निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नगरमधील सर्रास सिटीस्कॅन सेंटरवर हे चित्र दिसत आहे. मोठी गर्दी असल्याने एका सेंटरवर दरदिवशी २०० ते ३०० एचआरसीटी चाचण्या होत आहेत. त्यासाठी रुग्णांची तीन ते चार तास रांगेत राहून हेळसांड होत आहे. एवढे होऊनही त्याचा रिपोर्ट लगेच मिळत नाही. अनेक सेंटरवर रिपोर्टसाठी चोवीस तासांहून अधिक वेळ लागत आहे. काही सेंटरवर दोन-दोन दिवसही रिपोर्ट दिले जात नाहीत. परिणामी रुग्णांना पुढील उपचारात अडचणी येत आहेत.
--------------------
दररोज ६० ते ७० लाखांची कमाई
एका एचआरसीटी चाचणीसाठी अडीच हजार रुपये लागतात. नगर शहरात १५ ते २० सिटीस्कॅन सेंटर आहेत. एका सेंटरवर दररोज दीडशे ते अडीचशे चाचण्या होतात. या हिशेबाने हे सेंटरचालक दिवसाला ६० ते ७० लाख रुपये कमवतात.
-----------
प्रिस्क्रिप्शनशिवाय चाचणी
सध्या एचआरसीटी चाचणी अनेक सेंटरमध्ये प्रिस्क्रिप्शनशिवाय केली जात आहे. त्यामुळे लक्षणे नसणारे रुग्णही या चाचणीसाठी गर्दी करत आहेत. यातून गरजू रुग्णांना रांगेत थांबावे लागत आहे.
-------------
एचआरसीटी करण्यासाठी सध्या मोठी गर्दी आहे. बहुतांश चाचण्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार करत आहोत. आनंदऋषी रुग्णालयामध्ये शनिवार, रविवार असे दोन दिवस एचआरसीटी रिपोर्ट देण्यास उशीर झाला. इतर दिवशी मात्र असे होत नाही.
- डॉ. विनोद कटारिया, रेडिओलॉजिस्ट, आनंदऋषी हॉस्पिटल.