विहिरीचे काम करताना ढिगाऱ्याखाली दोघांचा मृत्यू; सारोळाबद्धी येथील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2022 10:22 PM2022-04-18T22:22:29+5:302022-04-18T22:22:40+5:30
दोघे मृत कामगार आष्टी तालुक्यातील
लोकमत न्यूज नेटवर्क
चिचोंडी पाटील (जि. अहमदनगर) : विहीर खोदण्याचे काम करणाऱ्या दोघांच्या अंगावर खडक, मातीचा ढिगारा कोसळून मृत्यू झाल्याची घटना सारोळाबद्धी (ता. नगर) शिवारात रविवारी (दि. १७) दुपारी घडली. मृत दोन्ही कामगार आष्टी तालुक्यातील लोणी सय्यदमीर येथील रहिवासी आहेत.
प्रल्हाद रोहिदास रक्ताटे (वय २८) व विलास शिवाजी वाळके (वय ४०, रा. लोणी सय्यदमीर, ता. आष्टी) अशी मृत कामगारांची नावे आहेत. याबाबत नगर तालुका पोलिसांनी सोमवारी माध्यमांना माहिती दिली. ती अशी की, सारोळाबद्धी शिवारातील बोरुडे या शेतकऱ्याच्या विहिरीच्या खोदाईचे काम सुरू होते. यासाठी ब्लास्टिंग करण्यात येणार होते. ब्लास्टिंगची स्फोटके ठेवण्यासाठी खडकाला ड्रिल मशिनच्या साहाय्याने छिद्र पाडण्याचे काम सुरू होते. त्यावेळी अचानक खडक व मातीचा ढिगारा कोसळला. या ढिगाऱ्याखाली विहिरीचे काम करणारे दोन कामगार गाडले गेले.
या घटनेनंतर इतर कामगार व स्थानिक नागरिकांनी त्यांना बाहेर काढून उपचारासाठी नगरच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार सुरू असताना सायंकाळी त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
कामगारांचा मृत्यू स्फोटामुळे?
या दोन्ही कामगारांचा मृत्यू ढिगारा कोसळून नव्हे तर जिलेटीन कांड्यांच्या स्फोटात झाला असून त्याला ठेकेदाराचा निष्काळजीपणा कारणीभूत असल्याचा आरोप मृतांच्या नातेवाईकांनी केला आहे. खडकाला ड्रिलने छिद्र पाडून झाल्यानंतर काही छिद्रात जिलेटिनच्या कांड्या टाकण्यात आल्या होत्या. परंतु याची माहिती त्या दोन कामगारांना दिली नाही. हे कामगार पुन्हा ड्रिल मारण्यासाठी विहिरीत उतरले. त्यांनी ड्रिल सुरू केले व त्याच्या हादऱ्याने जिलेटीनचा स्फोट होऊन दोघांचा मृत्यू झाला. ठेकेदारासह पोकलॅनमालकाने हे प्रकरण दाबण्याच्या अनुषंगाने चुकीची माहिती पोलिसांना दिली व चुकीचा पंचनामा केला. त्यामुळे यास ठेकेदारांसह इतर जबाबदार असून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी नातेवाईकांनी केली आहे. सध्या ठेकेदारासह इतर साथीदार फरार आहेत.