गोदावरी नदीपात्रात दोन डंपर पेटविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:20 AM2021-05-23T04:20:19+5:302021-05-23T04:20:19+5:30
तालुक्यातील नायगाव येथे गेल्या अनेक दिवसांपासून सर्रास बेकायदा वाळू उपसा सुरू आहे. अखेर शुक्रवारी ग्रामस्थांनी वाळू तस्करीमुळे कोरोनाच्या प्रसाराची ...
तालुक्यातील नायगाव येथे गेल्या अनेक दिवसांपासून सर्रास बेकायदा वाळू उपसा सुरू आहे. अखेर शुक्रवारी ग्रामस्थांनी वाळू तस्करीमुळे कोरोनाच्या प्रसाराची भीती व्यक्त करत मध्यरात्री रात्री तीन डंपर अडविले. महसूल व पोलीस प्रशासनाला याची माहिती दिली. यानंतर पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके व तहसीलदार प्रशांत पाटील तसेच जिल्हा पोलीस प्रमुखांनी तैनात केलेले विशेष पथक घटनास्थळी दाखल झाले. यावेळी त्यातील एक डंपर नदीपात्रातून बाहेर काढत असताना मागील दोन डंपर अज्ञात लोकांनी पेटवून दिले. मात्र घटनास्थळी डंपर चालक अथवा इतर कोणतीही यंत्रसामग्री मिळून आली नाही.
नायगाव येथे घडलेल्या या घटनेमुळे वाळूतस्करांमध्ये खळबळ उडाली आहे. दरम्यान ग्रामस्थांनी पेटवण्यात आलेल्या डंपरच्या घटनेशी आपला काहीही संबंध नसल्याचे म्हटले आहे. आम्ही केवळ डंपर अडवून प्रशासनाच्या ताब्यात दिले होते. मागे नदीपात्रात कोणी हे कृत्य केले याची कल्पना नाही, अशी माहिती सरपंच रा. ना. राशीनकर यांनी लोकमतला दिली.
वाळू तस्करीमधील स्पर्धेतून गाड्या पेटवण्यात आल्याचा संशयही व्यक्त होत आहे. पेटविण्यात आलेल्या डंपरविषयी मात्र अधिक माहिती देण्यास तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक मधुकर साळवे यांनी नकार दिला. याप्रकरणी अज्ञात आरोपींविरुद्ध वाळू चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस तपास सुरू आहे, तपासात ठोस माहिती हाती आल्यानंतर कळवले जाईल असे त्यांनी सांगितले.
----
ग्रामस्थांनी पोलीस संरक्षण मागितले
शुक्रवारी घडलेल्या या घटनेनंतर महसूल विभाग व पोलीस अधिकारी शनिवारी गावात दाखल झाले. यावेळी कोरोनाच्या स्थितीचा आढावा घेण्यात आला. ग्रामस्थांनी प्रशासनाकडे पोलीस बंदोबस्त देण्याची मागणी केली. सततचा वाळू उपसा तसेच अज्ञात लोकांनी डंपर पेटवल्यामुळे वाळू तस्करांपासून संरक्षण मिळावे अशी भूमिका ग्रामस्थांनी यावेळी घेतली.