अहिल्यानगरमध्ये भाजपच्या दोघांना, राष्ट्रवादीच्या एकाला मिळू शकते संधी; मंत्रिपदाचे सात दावेदार!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2024 11:19 AM2024-11-25T11:19:15+5:302024-11-25T11:19:55+5:30

शपथविधी सोहळ्यात मंत्रिपदाची शपथ घेण्याची संधी जिल्ह्यातील कोणाला मिळणार? याची उत्सुकता लागली आहे. 

Two from BJP one from NCP may get chance from Ahilyanagar Seven contenders for the position of minister | अहिल्यानगरमध्ये भाजपच्या दोघांना, राष्ट्रवादीच्या एकाला मिळू शकते संधी; मंत्रिपदाचे सात दावेदार!

अहिल्यानगरमध्ये भाजपच्या दोघांना, राष्ट्रवादीच्या एकाला मिळू शकते संधी; मंत्रिपदाचे सात दावेदार!

Ahilyanagar Election Reult ( Marathi News ) :  विधानसभा निवडणूक झाली. महाराष्ट्रात महायुतीला बहुमत मिळाले. आता राज्यात सत्तास्थापन कधी होणार? त्यात जिल्ह्यात कोणाला मंत्रिपद मिळणार याकडे लक्ष लागले आहे. त्यामध्ये भाजपच्या दोघांना, तर अजित पवार गटातील एका आमदाराला मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे नेमके कोणाला मंत्रिपद मिळणार? याची उत्सुकता लागली आहे.

विधानसभा निवडणुकीत राज्यात महायुतीला बहुमत मिळाले. अहिल्यानगर जिल्ह्यातही १२ पैकी १० जागा महायुतीला मिळाल्या. त्यामध्ये भाजपला ४, अजित पवार गटाला ४ आणि शिंदे सेनेला २ अशा एकूण दहा जागांचा समावेश आहे. शनिवारी विजयाचा जल्लोष केल्यानंतर आमदारांना विश्रांतीसाठीही पुरेसा अवधी मिळाला नाही. रविवारी भल्या सकाळीच महायुतीचे आमदार मुंबईकडे रवाना झाले. तेथे त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या भेटी घेतल्या आहेत. या तिन्ही नेत्यांच्या भेटीसाठी राज्यभरातून नवनिर्वाचित आमदार मुंबईत आहेत. महायुतीचे नेते शपथविधीची तारीख निश्चित करतील. शपथविधी सोहळ्यात मंत्रिपदाची शपथ घेण्याची संधी जिल्ह्यातील कोणाला मिळणार? याची उत्सुकता लागली आहे. 

जिल्ह्यात भाजपच्या दोन आमदारांना मंत्रिपदाची संधी मिळू शकते, राधाकृष्ण विखे पाटील हे शिर्डी मतदारसंघातून आठव्यांदा विधानसभेत पोहोचले आहेत. ते ज्येष्ठ नेते असून जिल्ह्यातील महायुतीच्या विजयाचे ते किंग मेकर ठरले आहेत. त्यामुळे त्यांची मंत्रिपदी वर्णी निश्चित आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते शिवाजी कर्डिले यांनी राहुरी मतदारसंघातून विजय मिळवला आहे. गतवेळी ते पराभूत झाले होते. जिल्ह्यात रणनिती आखण्यात कर्डिले यांचा मोठा वाटा असतो. तसेच ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह वरिष्ठ नेत्यांच्या कायम संपर्कात असतात. त्यामुळे त्यांचीही मंत्रिपदी वर्णी लागू शकते. शेवगाव मतदारसंघातून हॅटट्रिक करणाऱ्या आमदार मोनिका राजळे या जिल्ह्यात एकमेव महिला आमदार आहेत. त्यांचाही भाजपकडून मंत्रिपदासाठी विचार केला जाऊ शकतो. आमदार प्रा. राम शिंदे हे कर्जत जामखेड मतदारसंघातून अवघ्या १,२४३ मतांनी पराभूत झाले. त्यांचा हा निसटता पराभव आहे. ते ज्येष्ठ नेते असून २०१४ मध्ये राज्यात मंत्री झाले होते. ते विधान परिषदेतील आमदार आहेत. त्यामुळे त्यांनाही मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये बाळासाहेब थोरात, शंकरराव गडाख, प्राजक्त तनपुरे हे तीन मंत्री उत्तरेतील होते. महायुतीच्या सरकारमध्ये राधाकृष्ण विखे पाटील हे एकमेव मंत्री राहिले. त्यामुळे गत पाच वर्षात दक्षिण जिल्ह्याता मंत्रिपदाने हुलकावणी दिली. त्यामुळेच या नावांचा विचार भाजपकडून होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

कोणाची लागणार लॉटरी?

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे चार आमदार निवडून आले आहेत. त्यामध्ये कोपरगावचे आमदार आशुतोष काळे मोठे मताधिक्य घेऊन विजयी झाले आहेत. त्यांचे हे मताधिक्य राज्यात चर्चेचा विषय ठरला आहे. त्यामुळे त्यांनाही मंत्रिपदाची संधी मिळू शकते. 

अहमदनगर शहर मतदारसंघाचे आमदार संग्राम जगताप यांनी विजयाची हॅटट्रिक केली आहे. त्यामुळे त्यांनाही मंत्रिपदाची संधी मिळू शकते. प्रचारातही 'लाल दिवा, भावी मंत्री हाच मुद्दा त्यांच्या कार्यकर्त्यांनी अधिक प्रभावीपणे मांडला होता. भावी मंत्री म्हणून त्यांचे फलकही शहरात झळकले आहेत. अकोले मतदारसंघातून डॉ. किरण लहामटे यांनी दुसऱ्यांदा विजय मिळवला आहे. आदिवासी भागातील आमदार म्हणून त्यांना राज्य मंत्री मंडळात संधी मिळू शकते, अशीही चर्चा आहे.

Web Title: Two from BJP one from NCP may get chance from Ahilyanagar Seven contenders for the position of minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.