नगर जिल्ह्यात दोन शासकीय कृषी महाविद्यालये ? ; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार हळगावचे भूमिपूजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2017 08:15 PM2017-12-25T20:15:30+5:302017-12-25T20:15:55+5:30
शासनाने नियुक्त केलेल्या तज्ज्ञ समितीने श्रीगोंदा व जामखेड तालुक्यांत कृषी महाविद्यालय सुरू करण्यास अनुकूलता दर्शविल्याचे समजते. त्याआधारे दोन्ही कृषी महाविद्यालयांना मंगळवारी होणा-या मंंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी मिळणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
अहमदनगर : शासनाने नियुक्त केलेल्या तज्ज्ञ समितीने श्रीगोंदा व जामखेड तालुक्यांत कृषी महाविद्यालय सुरू करण्यास अनुकूलता दर्शविल्याचे समजते. त्याआधारे दोन्ही कृषी महाविद्यालयांना मंगळवारी होणा-या मंंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी मिळणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. दक्षिण नगर जिल्ह्यात एकाच वेळी दोन महाविद्यालयांना मंजूरी देऊन स्वपक्षातील वाद मिटविण्याबरोबरच दक्षिणेतील नेत्यांना बळ देण्याचे नवे धोरण सरकार राबवित असल्याची चर्चा सध्या जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात आहे.
शेती व्यवसायाची अलीकडच्या काळात कमालीची वाताहात झाली़ कधी नव्हे ते नगर जिल्ह्यातही शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरू झाले़ विशेष म्हणजे जिल्ह्यात स्वतंत्र कृषी विद्यापीठ आहे. त्याचा जिल्ह्यातील किती शेतक-यांना फायदा झाला, हा संशोधनाचा विषय आहे़ ते कमी म्हणून काय जिल्ह्यात नव्याने दोन कृषी विज्ञान केंद्रे आली. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांच्या बाभळेश्वर येथे तर माजी आमदार चंद्रशेखर घुले यांच्या दहिगाव-ने येथे नव्याने कृषी विज्ञान केंद्र सुरू झाले. केंद्रात व राज्यात आघाडीची सत्ता असल्याने ही केंद्र जिल्ह्यातील आघाडीच्या लोकप्रतिनिधींनी घेतली. दोन्ही केंद्र उत्तर नगर जिल्ह्यात सुरू झाली. दक्षिण नगर जिल्हा तसा दुष्काळी़ परंतु, या भागातील शेतक-यांना बळ देणारी एकही मातृसंस्था उभी राहिली नाही. दक्षिण नगर जिल्ह्याने जिल्ह्याला दोन पालकमंत्री दिले. ते दोन्ही सध्या भाजपात आहेत. माजी पालकमंत्री बबनराव पाचपुते जिल्ह्याचे पालकमंत्री राहिलेले आहेत. त्यावेळी राष्ट्रवादीत असलेले पाचपुते सध्या भाजपात आहेत. पालकमंत्री राम शिंदे हे मूळ भाजपाचेच आहेत. जिल्हा तिथे कृषी महाविद्यालय हे सरकारचे धोरण जाहीर होताच शिंदे यांनी त्यांच्या जामखेड तालुक्यातील हळगावाला कृषी महाविद्यालय सुरू करण्याचा प्रस्ताव दिला. परंतु, शिंदे यांचा हा प्रस्ताव पाचपुतेंच्या चांगलाच जिव्हारी लागला़ त्यांनी थेट महाविद्यालयावरच दावा ठोकला. वाद अखेर न्यायालयात गेला. न्यायालयाने तज्ज्ञ समिती नियुक्तीचा आदेश दिला. या समितीने दोन्ही तालुक्यांतील वस्तुस्थितीचा अहवाल सादर केला असून, दोन्ही ठिकाणी महाविद्यालय सुरू करण्यास हारकत नसल्याचे सरकारला कळविले आहे. पण, एका जिल्ह्यात एकच कृषी महाविद्यालय, असे सरकारचे धोरण आहे. मात्र स्वपक्षातील दोन्ही नेते महाविद्यालयांसाठी इरेला पेटल्याने सरकारकडून दोन्ही महाविद्यालयांना मंजुरी देण्याच्या जोरदार हालचाली सुरू असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.