जमीनीच्या वादावरुन दोन गटात हाणामारी: एकाचा मृत्यू, बारा जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2018 11:22 AM2018-08-30T11:22:44+5:302018-08-30T11:22:59+5:30
पाथर्डी तालुक्यातील कळसपिंप्री येथे गायरान जमिनीत पाणलोट विकासाचे काम सुरू असताना ग्रामस्थ व स्थानिक रहिवाशांमध्ये जोरदार हाणामारी झाली़ मारहाणीत जखमी झालेल्या कंस लक्ष्मण पवार (वय ३५)यांचा उपचारा दरम्यान बुधवारी मृत्यू झाला. या घटनेत बारा जण गंभीर जखमी झाले आहेत.
पाथर्डी : पाथर्डी तालुक्यातील कळसपिंप्री येथे गायरान जमिनीत पाणलोट विकासाचे काम सुरू असताना ग्रामस्थ व स्थानिक रहिवाशांमध्ये जोरदार हाणामारी झाली़ मारहाणीत जखमी झालेल्या कंस लक्ष्मण पवार (वय ३५)यांचा उपचारा दरम्यान बुधवारी मृत्यू झाला. या घटनेत बारा जण गंभीर जखमी झाले आहेत.
कळसपिंप्री ग्रामपंचायतीच्या हद्दीत ५० एकर गायरान जमीन आहे़ ग्रामपंचायतीच्या माध्यमातून या जमिनीवर पाणलोट विकासाचे काम सुरू आहे़ या जमिनीवर हक्क सांगणाऱ्या रहिवाशांनी या कामाला विरोध केला होता़ याबाबत गावाचे सरपंच बद्रिनाथ येढे यांनी पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला होता़ मंगळवारी (दि. २८)दुपारी या जमिनीत पोकलेन मशीन नेऊन खड्डे खोदण्याचे काम सुरू करण्यात आले होते़ यावेळी मैनाबाई बर्डे, शोभा बर्डे, बाळू गायकवाड, कंस पवार व इतर दहा ते पंधरा जणांनी या कामाला विरोध केला़ यावेळी वाद वाढून कळसपिंप्रीचे ग्रामस्थ व जमिनीवर हक्क सांगणाºयांमध्ये जोरदार हाणामारी झाली़ दगड, काठ्या, गलोलीच्या सहाय्याने एकमेकांवर हल्ला करण्यात आला़ या घटनेत गंभीर जखमी झालेल्या कंस लक्ष्मण पवार यांना जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते़ उपचारादरम्यान त्यांचा बुधवारी मृत्यू झाला़ तर मैनाबाई बर्डे, शोभा बर्डे, बाळू गायकवाड यांच्यासह सरपंच बद्रीनाथ येढे, संदीप मिसाळ, भगवान सोनवणे, विश्वनाथ बुळे, कमलाकर गाडे, दादासाहेब झिरपे, संदीप मिसाळ यांच्यासह दहा ते बारा जण जखमी झाले़ जखमींना प्रथम पाथर्डी येथील उपजिल्हा रुग्णालयात व त्यानंतर नगर येथे हलविण्यात आले़ या घटनेबाबत पाथर्डी पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.