जामखेड तालुक्यात दोन गटात हाणामारी : आठ जणांविरोधात गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2019 07:53 PM2019-04-24T19:53:57+5:302019-04-24T19:54:16+5:30
लोकसभा निवडणुकीच्या मतदानावेळी दुस-याचे मतदान करू पाहणा-य कार्यकर्त्यांना अडवल्याच्या कारणावरून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना विरोधी कार्यकर्त्यांकडून बेदम मारहाणीची घटना मंगळवारी घडली होती.
हळगाव : लोकसभा निवडणुकीच्या मतदानावेळी दुस-याचे मतदान करू पाहणा-य कार्यकर्त्यांना अडवल्याच्या कारणावरून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना विरोधी कार्यकर्त्यांकडून बेदम मारहाणीची घटना मंगळवारी घडली होती. या मारहाणीत चौघे जण जखमी झाले होते. बुधवारी उशिरा जामखेड पोलिसांत आठ जणांविरोधात अॅट्रासिटीसह विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
मित्रजीत भालेराव यांचा मुलगा विश्वजीत भालेराव (वय-23) हा लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेसचा मतदान प्रतिनिधी म्हणून पिंपळगाव उंडा येथील मतदान केंद्रावर काम पाहत होता. दरम्यान मतदान प्रक्रिया सुरू असताना गावातील विरोधी गटातील काही लोकांनी दुस-या मतदारांचे मतदान करण्याचा प्रयत्न केला असता फिर्यादी विश्वजीत याने आक्षेप नोंदवला होता. याच गोष्टीचा राग मनात धरून आरोपींनी फिर्यादी व त्यांच्या सहका-यांना बेदम मारहाण करून जखमी केले. या मारहाणीत फिर्यादीचे वडिल मित्रजीत भालेराव यांना शिवीगाळ केली. यानंतर रावसाहेब गव्हाणे यांना मारहाण करण्यात आली. या मारहाणीत विश्वजीत भालेराव, मित्रजीत दगडू भालेराव, गणेश हरीदास जगताप व रावसाहेब ज्ञानदेव गव्हाणे (सर्व रा. पिंपळगाव उंडा) हे चौघे जखमी झाले आहेत.
या मारहाणप्रकरणी सतिश विक्रम ढगे, उमेश श्रीधर ढगे, गणेश मधुकर ढगे, स्वप्नील बबन मोरे, रंजीत बबन ढगे, विलास घनश्याम मोरे, चत्रभुज घनश्याम मोरे, रमेश बबन ढगे अशा आठ जणांविरोधात जामखेड पोलिस स्टेशनला मारहाण, अॅट्रासिटी तसेच विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास कर्जत येथील उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप सातव व पोलिस निरीक्षक पांडुरंग पवार हे करत आहेत.